चौफेर न्यूज –  पिंपरी येथील भाजी मंडई बाहेर झालेल्या अतिक्रमणामुळे मंडई मधील भाजी विक्रेत्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. व्यवसायावरही परिणाम होत आहे. या अतिक्रमणांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजी मंडई मधील विक्रेत्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महापालिकेने पिंपरी येथे लालबहादूर शास्त्री भाजी मंडई उभारली आहे. त्यातील गाळे भाडेकराराने देण्यात आले आहे. मात्र, मंडईबाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणामुळे भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. शिवाय मंडईमधील गाळेधारकांनाही या अतिक्रमणाचा मोठा त्रास होत आहे. हे विक्रेते रस्त्यावरच भाजी फेकून देतात. त्यामुळे मंडईत प्रवेश करण्याआधीच नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याठिकाणी मोकाट जनावरांचा वावर देखील वाढला आहे. अतिक्रमणामुळे मंडईमध्ये येणाऱ्या गाड्यांमधील भाजीपाला उतरुन घेण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नसल्याने अनेकदा वादाचे प्रसंग उद्‌भवले आहेत. अधिकृत व अनधिकृत विक्रेते यांच्यातही वारंवार भांडणे होतात.

मंडईच्या बाहेर बेकायदेशीर भाजी विक्री होत असल्याने गाळेधारकांकडे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे अधिकृत विक्रेत्यांच्या व्यावसायावर परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा महापालिकेला निवेदने देण्यात आली होती. पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे आज भाजी मंडईमधील विक्रेत्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता.

भाजी मंडईपासून काढण्यात आलेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग महापालिकेवर जावून धडकला. महापालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर येथे दिवसभराचे उपोषण करण्यात आले. या मोर्चामध्ये लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील कुदळे यांच्या नेतृत्वाखाली 180 गाळेधारक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + eight =