चौफेर न्यूज – अयोध्या प्रकरणी येत्या १० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात होणारी आजची सुनावणी पुन्हा एकदा टळली आहे. केवळ ६० सेकंदात कोर्टाने हा निर्णय दिला. दरम्यान, पुढील सुनावणी आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अंतिम सुनावणी कधी होईल किंवा नियमित सुनावणी होईल की नाही हे १० जानेवारीलाच स्पष्ट होऊ शकेल.

राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर कोर्टाने केवळ ६० सेकंदामध्येच निर्णय देत १० जानेवारीला पुढील सुनावणी होईल असे सांगितले. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजय किशन कौल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी ठेवण्यात आली होती. पक्षकारांच्या दोन्ही बाजूंनी कोणतीही बाजू मांडण्यात आली नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

त्यामुळे आता १० जानेवारीला हे प्रकरण पुन्हा एकदा दोन न्यायमुर्तींच्या खंडपीठासमोर दाखल होईल. त्यानंतर ते याला तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे हस्तांतरीत करतील. मात्र, अद्याप या तीन सदस्यांच्या खंडपीठाची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामुळे आता १० जानेवारीलाच ते तीन न्यायमुर्ती कोण असतील हे स्पष्ट होईल. त्याचबरोबर याच दिवशी हे देखील स्पष्ट होईल की या प्रकरणी नियमित सुनावणी होईल की नाही.

दरम्यान, कोर्टाने अयोध्या प्रकरणी तत्काळ आणि दररोज सुनावणी घेण्याबाबत दाखल करण्यात आलेली जनहित याचिकाही फेटाळून लावली. अॅड. हरिनाथ राम यांनी नोव्हेंबर २०१८मध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 14 =