निगडी प्राधिकरणात चातुर्मासानिमित्त विविध कार्यक्रम

चौफेर न्यूज संतांनी दाखविलेल्या मार्गावरून जीवन प्रवास करताना सर्व बाजूंनी समाजाचा विकास होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी धर्माला राजाश्रयाची गरज होती. सध्या परिस्थिती बदलली आहे. उद्योग- व्यवसाय ज्यांच्या हातात आहेत, त्यांच्याकडेच अर्थव्यवस्थेचा ताबा आहे. त्यामुळे युवकांनी अर्थकारणात पुढे येऊन स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारावेत. जेणेकरून अर्थसत्ता तुमच्या ताब्यात येईल आणि त्यामाध्यमातून तुम्ही धर्माचा अर्थात समाजाचा विकास करू शकाल, असे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक राजेश सांकला यांनी व्यक्त केले.

पवित्र चातुर्मासनिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांना निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशन (जेएसओ) यांच्या वतीने ‘महाराष्ट्र सिंहनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष मनोहरलाल लोढा, निमंत्रक नितीन बेदमुथा, जेएसओचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी, संतोष धोका, सुभाष ललवाणी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जिटो) पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, विनोद मुथा आदींसह महाराष्ट्र तसेच देशरातून आलेले जैन बंधू आणि भगीनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प. पू. प्रफुल्लाजी म. सा., प.पू. हंसाजी म. सा., प. पू. पुनितीजी म. सा., प. पू. गरिमाजी म. सा., प. पू. महिमाजी म. सा. यांची विशेष उपस्थिती होती.

राजेश सांकला म्हणाले की, स्पर्धेच्या युगात युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायात यावे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) अशा युवकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावरून युवा उद्योजक आणि व्यावसायिक जागतिक स्पर्धा करू शकतात. स्पर्धेत तग टिकायचे असेल तर संघटन महत्वाचे आहे. युवक संघटीत झाल्यास समाज संघटीत होईल. हे संघटन म्हणजे तुम्हाला यशाचे शिखर गाठून देईल.

स्वागत अध्यक्ष मनोहरलाल लोढा म्हणाले की, अर्थसत्ता ज्याच्याकडे आहे तो आजच्या जगात यशस्वी म्हणून ओळखला जातो. धर्माचरण करताना अर्थकारणही केले पाहिजे. अर्थव्यवस्था आपल्याला उमगली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

प्रास्ताविक करताना निमंत्रक नितीन बेदमुथा म्हणाले की, संतांचा आशिर्वाद महत्वाचा आहे. समाजाला मार्ग दाखवण्याचे महान कार्य संत करतात. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या बाबी घेऊन आपण विकासाचा मार्ग चोखाळला पाहिजे. स्वविकासासह समाजाची प्रगती कशी होईल, याबाबतही चिंतन झाले पाहिजे. त्यासाठी एका छताखाली सर्वांनी एकत्र यावे. जितोच्या इंटरनॅशनल आणि पिंपरी- चिंचवड शहर शाखेच्या कार्याचे सादरीकरण करण्यात आले. जितोचे कार्य कसे चालते याबाबत या वेळी माहिती देण्यात आली. शारदा चोरडीया यांनी सूत्रसंचालन केले. तुषार मुथा यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × four =