‘यशस्वी’ संस्था व विवेकानंद केंद्राच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन साजरा

चौफेर न्यूज ः प्रचंड वेगवान स्पर्धा, धकाधकीचे जीवन, ढासळत चाललेली नीतीमत्ता अशा अस्वस्थ जीवनशैलीमध्ये सुद्धा खंबीर व्यक्तिमत्त्व निर्माण करता यावे, यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य समजून घ्यावे, असे आवाहन व्याख्याते ओंकार नाझरकर यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यशस्वी एज्युकेशन सोसायटी व विवेकानंद केंद्राच्या वतीने चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘यशस्वी’ एज्युकेशन सोसायटीचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रताप भोसले, विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी, ‘यशस्वी’ संस्थेचे कर्मचारी, वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाझरकर पुढे म्हणाले, युवक-युवतींनी करिअरच्या स्पर्धेत मालमत्तेचे ध्येय समोर बाळगतानाच ‘नीतीमत्तेला’ही प्राधान्याने महत्त्व द्यावे, तसेच येणार्‍या काळात जागतिक स्पर्धेत टिकून रहायचे असेल. तर प्रत्येकाने आपण ‘भारतीय’ आहोत ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासणे आणि त्यानुसार कृती करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी ‘आयआयएमएस’ चे संचालक डॉ. मिलिंद मराठे म्हणाले की, युवकांनी भाषिक कौशल्यात निपुणता आणण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. बर्‍याचदा असे दिसून येते की, अभ्यासात व तांत्रिक कौशल्यात उत्तम असूनही केवळ आपले म्हणणे नीट, व्यवस्थितपणे मांडण्याची कला अवगत नसल्याने अनेक युवक-युवती पात्रता असूनही विविध करिअर व रोजगार संधीपासून वंचित राहतात.

यावेळी विवेकानंद केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व सभेची अंतिम फेरी घेण्यात आली. तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र व पुस्तक बक्षीस स्वरुपात प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये दोन गटात वरूण जोशी, स्नेहल आटोळे हे दोन विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर सोमेजिता दास, वरूण चव्हाण यांना द्वितीय क्रमांक, कार्तिकी जाधव व पवन वागेकर यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित शेणॉय यांनी केले. सुत्रसंचालन प्रिया जोग यांनी तर आभार प्रदर्शन विवेकानंद केंद्राच्या चिंचवड शाखेच्या संचालिका अनुराधा मराठे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − ten =