डॉ. अमोल कोल्हेंसोबतचा फोटो व्हायरल

 पिंपरी चिंचवड ः मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत कोण कुणाचा प्रचार करेल हे सांगणे कठीण झाले आहे. निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती झाल्याने आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे जमत नसल्याने पक्षविरोधात प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर कार्यकर्ते, महापालिका निवडणुकीतील भाजपचे उमेदवार व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे हे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. शिरूर मतदारसंघातही शिवसेना आणि भाजपचे फारसे पटत नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारून भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.

मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील आजपर्यंत फारसे सख्य नव्हते. राष्ट्रवादीने कायम काँग्रेसला संपवण्याचेच काम केले. आज त्याच राष्ट्रवादीला काँग्रेसची नितांत गरज आहे. लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी असून, मावळ आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहेत. या राजकीय वास्तवतेच्या पार्श्‍वभूमीवर मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात कोण कोणाचे काम करेल याचा काही नेम राहिलेला नाही. शिवसेना आणि भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे काम करत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता शिरूर मतदारसंघातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. चिखली-तळवडे परिसरातील माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे हे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. सुरेश म्हेत्रे हे 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते. त्याचप्रमाणे म्हेत्रे हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सुरेश म्हेत्रे यांच्या भावाची सून स्वीनल म्हेत्रे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहे. त्यामुळे सुरेश म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करणे हा राजकीय चर्चेचा विषय झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + fifteen =