राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती विलास नांदगुडे यांची पक्षाला सोडचिठ्ठी
पिंपरी चिंचवड ः मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक उमेदवार न दिल्याने माजी स्थायी समिती सभापती विलास नांदगुडे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उभे केले आहे. पुढे शिरुर लोकसभा मतदारसंघात रोहित पवार यांना उभे करणार, त्याच्यापुढे पुण्यामध्ये अन्य कोणता घरचा उमेदवार तुम्ही उभे करणार, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामे करुन नुसते आपले जोडे उचलायचे का? असा सवाल उपस्थित करून त्यांनी  भाजपचे कौतुक करत खासदार श्रीरंग बारणे यांना मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रातून केले आहे.
नांदगुडे म्हणतात की, मी 1981 पासून शरद पवार यांच्या विचाराशी संलग्न राहिलो. गेली 38 वर्ष त्यांच्याबरोबर ते सांगतील. त्या पक्षाचे काम केले. सगळ्यांनी आघाडीचा धर्म पाळावयाचा व आपल्यावर वेळ आली की आघाडीचा धर्म पाळायचा नाही, हे आम्ही जवळून पाहिले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून स्थानिक कोणताही उमेदवार दिला असता तरी चालला असता, अशी सर्वसामान्य कार्यकर्ते, नेत्यांची भावना आहे. बारामती मतदार संघ तुमचा घरचा मतदारसंघ आहे. तेथे तुम्ही पिढ्यानपिढ्या तुमच्याच घरातील उमेदवार उभे केले. तरी त्यावर कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही.
कार्यकर्ते घरदार सोडून आपल्या पक्षाचे काम करुन आर्थिक मेटाकुटीला आले आहेत. ते काम करतात की, एक ना एक दिवस आपल्याला संधी मिळेल आणि संधी आली की ती आपण आपल्या कुटुंबातील लोकांसाठी घेत आहात, हे बरोबर आहे का? असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. परंतु, राष्ट्रवादीतून गुंड, लॅन्ड माफिया, भ्रष्टाचारी अंगठे बहादुर भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचा पराभव करेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही नांदगुडे यांनी नमूद केले आहे.
आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामध्ये एकतरी राष्ट्रवादी मुद्दा आहे का? हा एक प्रश्‍न नेहमी माझ्यासमोर उपस्थित होत आहे. नरेंद्र मोदी यांना समाजासाठी व देशासाठी आपल्या स्वत:च्या घराची होळी केली आहे. खरोखरच त्यांनी देशासाठी व देशातील सामान्य नागरिकांसाठी खुप महत्वाचे निर्णय घेतले आहेत. स्वाभिमानी मतदार बंधु-भगीनींनी श्रीरंग बारणे यांनाच मत देऊन आपला स्वाभीमान जागृत ठेवावा, अशी विनंती नांदगुडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − fourteen =