आपली नियुक्ती लोकांची कामे करण्यासाठी; उपमहापौर भरसभेत संतापले

पिंपरी चिंचवड ः प्रभागातील कामे करण्यासाठीच लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. तुमची नियुक्ती सुध्दा लोकांची कामे करण्यासाठी आहे. त्याचे भान असू द्या. आमची वैयक्तीक कामे करण्यासाठी तुम्हाला मोबाईलद्वारे संपर्क साधत नाही. जबाबदारीचे भान असून द्या. पुन्हा बोलायची वेळ येऊ देऊ नका, अशा शब्दांत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना भरसभेत खडेबोल सुनावले. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्याची तहकूब सभा गुरुवारी पार पडली. या सभेमध्ये उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी प्रशासनाला ताळ्यावर आणले.

प्रभागात मोठमोठ्या अनधिकृत इमारती…
सचिन चिंचवडे म्हणाले की, पावसाळा तोंडावर आला आहे. ड्रेनेज लाईन, रस्त्यांची प्रलंबित कामे किंवा पावसाळ्यापूर्वीच्या कामांवर तसेच प्रभागात गोरगरीबांच्या घरांवर होणारी कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, आयुक्तांनी कुठल्याच विषयांची दखल घेतली नाही. प्रभागात मोठमोठ्या अनधिकृत इमारती उभ्या आहेत. त्यावर लाखो रूपये नागरिकांनी कमावले आहेत. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावरील कारवाई टाळत आहेत. अधिकार्‍यांचे आर्थिक हित साधले की कारवाई गुंडाळून ठेवली जाते. अनधिकृत बांधकामावर पोलिस संरक्षण देऊन कारवाई कऱण्यापेक्षा हे बांधकाम वाढू नये. यासाठी उपाययोजना का केल्या जात नाहीत?. प्रभागामध्ये ओढे, नाले बुजवून त्यावर मोठमोठ्या इमारती उभारल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कारवाई फक्त गरिबांवरच…
कारवाई फक्त गोरगरीबांच्या घरावरच केली जाते, असा आरोप उपमहापौर चिंचवडे यांनी केला. नागरिकांची कामे करण्यासाठीच आम्ही तुमच्याशी संपर्क साधतो. आमच्या घरची कामे करण्यासाठी नाही. आपण लोकांची कामे करण्यासाठी या पदावर बसलो आहोत. याचे भान असू द्या. फोन केल्यावर उचलून संवाद करण्याचे टाळून काय सिध्द होणार आहे. केवळ चेहरे पाहून प्रतिसाद देण्याचे सोडा. आम्ही पदाधिकारी लोकांची कामे करण्यासाठी आहोत. त्यासंदर्भात विचारणा केल्यास प्रत्युत्तर देत चला. अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत चिंचवडे यांनी आयुक्तांना सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =