संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान;  टाळ- मृदंगाचा गजर; वारकर्‍यांचे विविध खेळही रंगले

देहू ः तुकोबा, तुकोबा असा अखंड जय घोष, टाळ- मृदंगाचा गजर महिला वारकर्‍यांनी धरलेला फुगडीचे फेर ज्ञानबा तुकोबाचा निनादणारा घोष, भगवी पदका खांद्यावर घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्याचे सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी  देहूनगरी लाखोंच्या संख्येने गजबजून गेली. तुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटेपासूनच देहूनगरीत भक्तीभावाचे वातावरण पसरले होते. पहाटे मुख्य मंदिर व शिळा मंदिरात विश्‍वस्त संतोष मोरे, माणिक मोरे, आणि विशाल मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक विधींनंतर सकाळी दर्शनबारी सुरू करण्यात आली. दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी भल्या पहाटेच इंद्रायणीचा काठ वैष्णवांनी फुलून गेला होता.

पादुकांची महापूजा…
सकाळी दहाच्या सुमारास ह.भ.प रामदास नाना मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर इनामदारवाड्यात तुकोबांच्या पादुका आणून महापूजा करण्यात आली. मानकरी म्हसलेकर यांनी परंपरेप्रमाणे पादुका डोक्यावर घेऊन वाजत-गाजत त्या मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, सरपंच पुनम काळोखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विश्‍वस्त संजय मोरे, रोहीत पवार, उल्हास पवार, भाजपनेते श्रीकांत भारतीय आणि हवेलीच्या तहसीलदार गीता गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण..

पादुकांची पूजा सुरू असतानाच दुसरीकडे मंदिराच्या आवारामध्ये टाळ- मृदंगाचा गजर सुरू झाला. त्या बरोबरीने वारकर्‍यांचे विविध खेळही रंगले. वारकर्‍यांनी फुगडीचा फेर धरला. पालखी प्रस्थानाची तुतारी वाजली अन् पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल, असा घोष करीत देहूकरांनी पालखी खांद्यावर घेतली. त्यानंतर वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण झाले. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाडयात आजोळघरी दाखल झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + seventeen =