चौफेर न्यूज – इंधन दरवाढीमुळे गेल्या तीन महिन्यांत वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत असतानाच एसटी महामंडळालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणा-या बस गाडय़ा आहेत. डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ एसटी महामंडळाच्या मुळावर उठली आहे. फक्त इंधनापोटी ४१ कोटी ५८ लाख रुपये जादा मोजावे लागले आहेत.

एसटी महामंडळाला आधीच दोन हजार ४०० कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी हाच तोटा दोन हजार कोटी रुपयांपर्यंत होता. कामगारांचा पगार, टायरवर खर्च याबरोबरच इंधन दरवाढ तोटय़ात मोठी भर पडत जाते. डिसेंबर महिन्यापासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे आणि त्याचाच फटका महामंडळाला बसू लागला आहे. महामंडळाला दिवसाला १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेल लागते. या डिझेलचा पुरवठा इंडियन ऑईल कंपनीकडून होतो. नोव्हेंबर महिन्यात प्रतिलिटर ५७.९८ या दराने डिझेल महामंडळाने विकत घेतले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ५९.५९ रुपये मोजावे लागले.

भाडेवाढीची मात्रा शक्य

सातत्याने होणारी इंधन दरवाढ, वेतनवाढ, बसगाडय़ांच्या वाढणा-या किमती इत्यादीमुळे एसटीवर आर्थिक भार पडत असेल तर भाडेवाढ लागू करण्याचे सूत्र महामंडळाचे आहे. त्यामुळे सध्या वेतनवाढीवर चर्चा सुरू असतानाच सातत्याने होणारी इंधन दरवाढ हे देखील भविष्यात एसटीची भाडेवाढ होण्यास कारणीभूत ठरू शकते.

आकडेवारी अशी..

नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात एसटी महामंडळाला १३ कोटी ८ लाख १६ हजार ६२५ रुपये डिझेलसाठी जादा किंमत द्यावी लागली. तर जानेवारी महिन्यात १८ कोटी ९० लाख ७७ हजार २५० रुपये आणि फेब्रुवारी महिन्यातही ९ कोटी ५९ लाख ८ हजार रुपये मोजावे लागल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एकूणच डिझेलसाठी ४१ कोटी ५८ लाख २ हजार ६२५ रुपये जादा मोजावे लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =