हिंजवडीत उद्योजक परिषदेला सुरुवात

चौफेर न्यूज –   यशस्वी उद्योजक होण्यासाठी फक्त कौशल्य असून चालत नाही, तर जिद्द, इच्छाशक्तीही असावी लागते. त्याचबरोबर आपले लक्ष्य निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी स्वत:चे प्रशिक्षक स्वत:च व्हा. विचार, विश्‍वास आणि साध्य ही त्रिसुत्री उद्योगामध्ये येणार्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ लेखक आणि उद्योजक नीरज राठोड यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील उद्योजकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी हिंजवडी येथील हॉटेल ओरिटेल येथे आयोजित यंग अंत्रेप्रेनर्स समिट (युवा उद्योजक परिषद) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्रासह देशभरातील उद्योजक होऊ इच्छिणारे सहभागी झाले आहेत. परिषदेत उद्योजक बी.आर. व्यंकटेश, स्टार्टअप इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चिक्कारा, माध्यम समन्वयक शबनम अस्थाना, सी स्टार हॉलिडेच्या संस्थापिका वनश्री हिरामठ, एनएफआयच्या मिनी कक्कर, आयोजक सुजाता मेंगाने, संदीप काळे आदींनी युवक युवतींना उद्योगासंबंधी मार्गदर्शन केले. प्रिया कोठारे आणि प्रवीण जाधव यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ही उद्योजक परिषद 12 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे.

नीरज राठोड यांनी पुढे सांगितले, की स्वत:चे प्रशिक्षक स्वत:च व्हा. तुम्हाला नेमके काय करायचे हे ठरवा. स्वत:च स्वत:ची प्रेरणा बना. ‘लोक काय म्हणतील’, याकडे दुर्लक्ष केले तरच उद्योगात यशस्वी व्हाल. तसेच उद्योगामध्ये यशस्वी ठरलेल्या लोकांसोबत आपला वेळ घालवा. त्यामुळे त्यांचे आत्मपरीक्षण करून आपणही तसे बनण्याचा प्रयत्न कराल. काहीतरी करण्याची अंतर्मनात उर्मी हवी. लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गोष्टी साध्य होतील, असेही राठोड म्हणाले.

अनिल चिक्कारा म्हणाले, की नवीन उद्योग उभा करताना आपल्या हातून अनेक चुका घडू शकतात. स्वत:च्या चुकांचे स्वत:च आत्मपरीक्षण करून त्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतली आणि मेहनत घेऊन काम केल्यास व्यवसायात यश मिळवता येते. त्याचबरोबर स्वत:वर विश्‍वास आणि दुर्दम्य इच्छाशक्तीही हवी. काहीतरी करण्याची अंतर्मनात भूख हवी, असेही त्यांनी सांगितले.

शबनम अस्थाना यांनी सांगितले, की तीस वर्षापूर्वी महिलांना फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. गेल्या काही वर्षात महिलांसाठी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती पूरक बनली आहे. त्यामुळे लोकांच्या सांगण्यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे, हे ठरवून काम केल्यास उद्योगात निश्‍चित यश मिळते. आत्मविश्‍वास हवा, तसेच लोकांच्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणेही गरजेचे आहे.

वनश्री हिरामठ म्हणाल्या, की उद्योगासंबंधी ज्ञान आत्मसात करून उद्योग सुरु करणे फायदेशीर ठरते. पैसा आणि पॅशन या दोन्ही गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. स्टार्टअपमध्ये ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच जोखीम पत्करल्याशिवाय उद्योजक बनता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रिया कोठारे आणि प्रवीण जाधव यांनी केले; तर सुजाता मेंगाने यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − sixteen =