सुमारे 38 कोटी 88 लाख रूपये एवढे मिळणार विमा संरक्षण

पिंपरी चिंचवड ः पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील 1296 विद्यार्थी व प्रत्येकी एक पालकांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून सुमारे 38 कोटी 88 लाख रूपये एवढे विमा संरक्षण मिळणार आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी अपघाती विमा पॉलिसी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे सुपूर्त केली.

यावेळी, कुंदा भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, महापालिका शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती बेताची असते. तसेच अनेक पालकांची कोणत्याही प्रकारचे विमा किंवा मेडिक्लेम केलेला नसतो, त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला तर पालकांना हजारो रुयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढणे काळाची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत. या अपघाती विम्यात विद्यार्थ्यांना अपघात झाला तर 25 हजार रूपयापर्यंत रुग्णालयातील खर्च मिळणार आहे. तर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास पालकांना 1 लाख तर पालकांचा मृत्यू झाल्यास त्या पाल्यावर शिक्षणापासून वंचित राहाता येऊ नये म्हणून त्या पाल्यास रुपये 2 लाख मिळणार आहेत.

पिंपळे सौदागर मधील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना अपघाती विमा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शहरातील महापालिका शाळेसह खाजगी शाळा चालकांनी देखील अशा अपघाती विमा करणे काळाची गरज आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता इसकांडे, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे, सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास काटे, आनंद हास्य क्लबचे सचिव राजेंद्र जयस्वाल, कांचन काटे, सुवर्ण काटे, विवेक भिसे, यश राक्षे, गजानन देसाई तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच राजकीय सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आर.एच.डी. हेल्थकेअरच्या संचालिका म्हणाल्या, सध्या राज्यासह देशात अपघाती विमा करणार्‍या भरपूर कंपन्या आहेत. मात्र ही एकमेव कंपनी अशी आहे की, सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा आर्थिक बजेटमध्ये अनेक सुविधा देण्यात येत आहेत. यात नर्स व रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी, प्रथम उपचार यासह अनेक सुविधा देण्यात येणार असल्याने नागरिकांनी देखील हा अपघाती विमा करावा. कार्यक्रमाची प्रस्तावना आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालायातील शिक्षिका कविता चव्हाण यांनी केले. अंकुश इंगवले यांनी सर्वांचे आभार मानले.
———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + 5 =