चौफेर न्यूज – एकाचवेळी विधानसभा व लोकसभा निवडणुका घेणे हे २०२४ पूर्वी शक्य होणार नाही, कारण त्यात घटनादुरूस्ती आधी करावी लागेल, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस.कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही निवडणुका दर पाच वर्षांनी एकाच वेळी घेणे ही खरेतर आदर्श पद्धत असेल, असे सांगून ते म्हणाले की, तसे लगेच करता येणे शक्य नाही कारण त्यासाठी आधी घटनादुरूस्ती करावी लागेल. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या मांडलेल्या प्रस्तावावर छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले.

ते म्हणाले की, आपण वेस्टमिनिस्टर पद्धत वापरतो. जर आपण अमेरिकी पद्धत वापरत असतो तर त्यात कार्यकारी मंडळाची ठरावीक मुदत असते. जरी कुणी सत्ताभ्रष्ट झाले तरी दुसऱ्या कुणाची तरी निवड केली जाते, तोपर्यंत आधीचे सरकार कायम राहते. समांतर निवडणुकांना दुसरा पर्याय म्हणजे सर्व निवडणुका एका वर्षांच्या ठरावीक कालावधीत घेणे हा आहे. संसदीय समितीने हा पर्याय सुचवला असून त्यावर अजून अभ्यास करावा लागेल. त्याच्या अंमलबजावणीसाठीही घटनादुरूस्ती करावी लागेल.

प्रशासकीय पातळीवर व पैसे वाचवण्यासाठी एकाचवेळी निवडणुका घेणे हा सोयीचा उपाय आहे. त्यामुळे व्यक्तिगत टीका टिपणी, विखारी प्रचार, सूडाचे राजकारण हे प्रकार नेहमीच चालतात, ते बंद होतील असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही कारण काही राज्यातील सरकारांची पाच वर्षांची मुदत ही आताच सुरू झाली आहे. काही राज्यात निवडणुका अपेक्षित आहेत. २०२४ मध्ये एकाचवेळी निवडणुका घेता येणे शक्य आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकाच मतदार यादीवर घेण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेवर त्यांनी, निवडणूक आयोगाने हीच भूमिका वेळोवेळी मांडली आहे. पण एकच मतदार यादी वापरण्याच्या प्रयोगातही राज्यांच्या निवडणूक कायद्यात बदल करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 2 =