सांघिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी

चौफेर न्यूज –  झटपट क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय विश्‍वक्रमवारीतील फलंदाजांच्या मानांकन यादीत आपले अग्रस्थान कायम राखले आहे. सध्या कोहलीच्या नावावर 873 गुमांची नोंद असून श्रीलंकेविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत चमकदार कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकावरील डेव्हिड वॉर्नरवर असलेली 12 गुणांच्या आघाडीत आणखी भर घालण्याचीही कोहलीला संधी आहे.

एकदिवसीय फलंदाजांच्या मानांकन यादीतील पहिल्या 15 क्रमांकांमध्ये महेंद्रसिंग धोनी (12वा), शिखर धवन (13वा), तसेच नवा उपकर्णधार रोहित शर्मा (15) या अन्य भारतीय फलंदाजांनीही स्थान मिळविले आहे. मात्र गोलंदाजांच्या मानांकन यादीतील पहिल्या 10 क्रमांकांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. केवळ भुवनेश्‍वर कुमार या एकमेव भारतीय खेळाडूला पहिल्या 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले आहे. भुवनेश्‍वर 13व्या क्रमांकावर आहे.

सांघिक विश्‍वक्रमवारीत भारतीय संघ सध्या 114 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. परंतु हे स्थान राखण्यासाठीही भारताला श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने जिंकावी लागेल. ही मालिका 3-2 अशी जिंकल्यास भारत 113 गुणांसह चौथ्या क्रमांकावरील इंग्लंडला मागे टाकण्याची संधी देईल.

दरम्यान मालिकेतील किमान दोन सामने जिंकल्यास 2019 विश्‍वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याची श्रीलंकेला संधी आहे. सध्या आठव्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचे 88 गुण असून यजमान इंग्लंडशिवाय विश्‍वक्रमवारीतील पहिले सात संघ थेट पात्र ठरणार आहेत. त्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 1 =