महसूल दिनानिमित्त ऑनलाईन सातबाऱ्याचा शुभारंभ

चौफेर न्यूज –

सातबारा ऑनलाईन झाल्यामुळे तो सर्वांसाठी खुला झाला आहे. परंतु, सातबारा ऑनलाईन झाला असला तरी दुष्प्रवृत्ती मात्र, कायम आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपला सातबारा नियमित बघावा, जेणेकरुन आपल्या सातबाऱ्यात काय फेरफार झाली आहे, हे समजेल व आपली फसवणूक टळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात ऑनलाईन सातबाऱ्यांचे वितरण करण्यात आले..

जिल्हा महसूल विभागातर्फे महसूल दिनानिमित्त काल (दि.१) येथील अपर तहसील कार्यालयात महसूल फलक अनावरण, घडी पत्रिकेचे प्रकाशन व ऑनलाइन सातबारा सॉफ्ट कॉपी लॉन्च करण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ, अपर तहसीलदार ज्योती देवरे, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, बार असोसिएशनचे अध्यक्ष श्यामकांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, प्रकाश चव्हाण, नगर भूमापन अधिकारी श्री. फुलपगारे, जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक भै. गो. येरमे, पी.डी.चव्हाण, मनपा अभियंता कैलास शिंदे, आदी उपस्थित होते. .

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना आता शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज नाही. सातबारा ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येकाला घरबसल्या तो स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही पाहता येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपला सातबारा नियमितपणे बघितला पाहिजे. अन्यथा दहा पंधरा वर्षांनी सातबारा पाहिल्यास त्यावर अन्य कोणाचे तरी नाव लावलेले दिसते. असा प्रकार घडू नये म्हणून प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. त्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहू नये. प्राताधिकारी गणेश मिसाळ म्हणाले, की ऑनलाईन सातबाऱ्यावर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. त्यामुळे त्यावर स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसेल. आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले की, आता महसूल प्रशासनात सुधारणा झाल्या आहेत. या पाश्र्र्वभूमीवर आम्हीही शहरातील नागरिकांना ई-प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्योती देवरे यांनी ऑनलाईन सातबाऱ्याबाबत जागृती करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत आठवडे बाजार, बसस्थानक अशा ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + four =