कचरा वेचक कामगारांची आरोग्य तपासणीच नाही
माहिती अधिकारात उघड
चौफेर न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील कचरा वेचक कर्मचारी व कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात येत नाहीत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कचरा वेचक कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
कचरा कामगारांना गुडघाभर कचर्‍यात उभे राहून नागरीकांनी दिलेला कचरा गाडीत टाकावा लागतो. त्यांना गमबुट, मोजे, मास्क या अत्यावश्यक वस्तू दिल्या जात नाहीत. परंतु यापूर्वी अनेक वर्षांपासून कोणत्याही सुविधेविना कामगार कचरा उचलण्याचे काम करत आहेत. ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दितील कचरा गोळा करणार्‍या कामगारांची आरोग्य तपासणीच केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांनी कंत्राटदारावर कारवाई करणे अपेक्षित असताना देखील आरोग्य विभागाचा अधिकारीवर्ग कंत्राटदारावर मेहेरबान का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका व कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे कष्टकरी कामगारांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, त्यांनी दिवसभर कचर्‍यात काम केल्यामुळे अनेकांना गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. याकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, कामगारांच्या आरोग्यासाठी ठोस उपाययोजना व सर्व कंत्राटी कामगारांची किमान सहा महिन्यांतून एकदा पूर्णपणे शारीरिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.
शहरातील विविध क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दितील कचरा गोळा करण्याची कामे कंत्राटी पद्धतीने दे÷ण्यात आले असून त्यासाठी महापालिकेकडून अनेक ठेकेदार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामांसाठी ठेकेदारांनी कर्मचारी व कामगार नियुक्त केलेले आहेत. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व कंत्राटी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असल्याचे नमुद केले आहे. तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या पर्यवेक्षीय अधिकार्‍याने कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविली आहेत किंवा नाही याची तपासणी करावी, असे सांगितलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × three =