चौफेर न्यूज – शेतक-यांच्या संपानंतर दबाव वाढल्यामुळे राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. त्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र ऑनलाईन अर्ज भरून घेतलेल्या शेतक-यांपैकी ४० टक्के अर्ज छाननी अंती बाद झाल्याचे समोर आले. बँकामार्फत ही माहिती शेतक-यांपर्यंत पोहचल्यानंतर आता पुन्हा शेतक-यांमधून संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक छाननीतील निष्कर्षावरून १४ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही शेतक-यांना कर्जमाफ झाले आणि काही लोक वंचित राहिले तर निराशेची भावना अधिक वाढीस लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांची नाराजी हे भाजप सरकारला महाग पडू शकते.

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी केलेली संघर्ष यात्रा, त्यानंतर शेतक-यांनी केलेला स्वातंत्र्यानंतरचा पहिला संप यामुळे सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान’ योजना जाहीर केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा प्रचार सरकारतर्फे करण्यात आला होता. या कर्जमाफीचा लाभ ८९ लाख शेतक-यांना होईल, असा सुरुवातीचा अंदाज होता. त्यानंतर त्या संदर्भातील अटी व निकष जाहीर करण्यात आले. त्यानुसार शेतक-यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे ७७ लाख शेतक-यांना अर्ज दाखल करता आले. त्यानंतर झालेल्या छाननीअंती ६९ लाख शेतकरी हे माफी योजनेचे लाभार्थी ठरू शकतील, असा प्राथमिक अंदाज होता. त्या पुढील तंत्रज्ञान खात्याच्या पडताळणी टप्प्यात आणखी २२ लाख शेतकरी बाद ठरले.

त्यामुळे माफीपात्र ठरू शकणा-या ४७ लाख, ४६ हजार, २२२ शेतक-यांची ‘ग्रीन लिस्ट’ सरकारने जाहीर केली. या २२ लाख शेतक-यांची जिल्हाधिकारी पातळीवर छाननी सुरू आहे. या शेतक-यांसाठी २३,१०२ कोटी रुपयांची माफी देय आहे, असे निश्चित करण्यात आले. आजवर ३१,लाख ९ हजार ७६९ शेतक-यांच्या बँक खात्यांत १२ हजार ३२६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे १६ लाख शेतक-यांपैकी आठ लाख शेतक-यांना ‘वन टाईम सेटलमेंट’चा पर्याय देण्यात आला असला तरी त्यातील केवळ आठ हजार शेतक-यांनीच अर्ज केले आहेत. इतर सुमारे आठ लाख शेतक-यांवरील कर्जमाफी होणार की नाही याबाबत साशंकता कायम आहे.

कर्जमाफीसाठी सादर झालेल्या एकूण अर्जातील सुमारे १८ लाख अर्ज हे ‘अनमॅच’ ठरवण्यात आले आहेत. अर्ज भरण्यातील तांत्रिक त्रुटी, आधारसंलग्न माहिती व इतर बाबींमुळे माफीसाठी अपात्र ठरणे आदी कारणे त्यामागे आहेत. एकूण विचार करता १४ लाख शेतकरी माफीपासून वंचितच राहतील, असा कयास आहे.

कर्जमाफीच्या जोरदार घोषणा होऊनही अद्याप प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नसल्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोषाचे वारे आहे. त्यात काही शेतक-यांना कर्जमाफी झाली आणि काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले तर हा संताप आणखी वाढू शकतो. आपल्या बाजूच्या माणसाला एखादा लाभ मिळाला आणि आपलाही तोच हक्क असताना तो जर मिळाला नाही, तर निराशा तीव्र होते. धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या अशाच निराशेतून केली होती. आताही जर काही शेतक-यांना कर्ज मिळाले आणि काहींना मिळाले नाही, तर त्यातून निराशेची भावना वाढीस लागून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या काळातच असा पक्षापातीपणा झाला तर त्याच्या परिणामाला सामोरे जाण्याची तयारी भाजपला ठेवावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + 6 =