रद्दीचा भाववाढला !

चौफेर न्यूज राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिकबंदीनंतर प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावरील निर्बंध उच्च न्यायालयाने काहीसे शिथिल केले असले तरी, या बंदीचा परिणाम रद्दी कागदाच्या बाजारात आतापासूनच दिसू लागला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय असलेल्या कागदी पिशव्यांच्या निर्मितीवर उत्पादकांनी भर दिल्याने या क्षेत्राकडून रद्दी कागदाला मागणी वाढत आहे.

परिणामी घराघरातून ९ ते १० रुपये किलोने विकली जाणारी रद्दी आता ११ ते १२ रुपये किलो दराने विकली जात आहे. कागदी पिशव्या, ताट, कप यांच्या निर्मितीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

पावसाळ्यानंतर रद्दीला अशीही मागणी वाढते. रद्दी साठवण्याकरिता पुरेशी जागा नसल्याने व्यापा-यांना ठरावीक ती एका मर्यादेपलीकडे जमा करता येत नाही. पावसाळ्यानंतर मात्र मोकळ्या जागी रद्दी साठविता येते. त्यामुळे तिला भाव येतो. त्यात प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचा परिणाम झाल्याने रद्दी खरेदीच्या दरामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. निकाल लागल्यानंतर जुनी पुस्तके, वह्या रद्दी बाजारात येतात. मे महिना हा रद्दीकरिता हंगामाचा असतो. त्या वेळी रद्दी खरेदीचे दर असेही वाढतात.

प्लास्टिकबंदीची घोषणा झाल्यापासूनच बाजारात प्लास्टिकला पर्याय देणा-या कागदी वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे या मागणीचा अप्रत्यक्ष परिणाम रद्दी कागदाच्या खरेदीवर पडला आहे. थोडक्यात गेल्या काही दिवसांपासून रद्दी खरेदीचा दर वाढला आहे. किरकोळ पद्धतीने रद्दी खरेदी करणा-या दुकानांमध्ये रद्दीचा दर २ रुपयांनी वाढला आहे. यापूर्वी ग्राहकांकडून ९ ते १० रुपयांना खरेदी केली जाणारी रद्दी ११ ते १२ रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे.

कागदी पिशव्यांचे उत्पादन करणा-या व्यापा-यांकडूनच मागणी वाढली आहे. त्यामुळे रद्दीच्या दरांत वाढ झाल्याची माहिती दादर येथील रद्दी व्यापारी जयेशभाई चावला यांनी दिली. प्लास्टिकबंदीच्या निर्णयामुळे कागद वा पुठ्ठे यापासून तयार होणा-या विविध वस्तूंचा बाजार विस्तारतो आहे. कागदी पिशव्या, ताट, कप यांच्या निर्मितीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाल्याची माहिती भिवंडी येथील कागदाचे उत्पादक मनोहर सिंग यांनी दिली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कागदाला मोठी मागणी आहे. पावसाळ्यामध्ये रद्दी खरेदीला आणि त्याचा निर्यातीला फटका बसत असल्याने मार्च ते जून या कालावधीत रद्दीच्या खरेदी दरामध्ये वाढ होत असल्याची व्यापाऱ्यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + 14 =