चौफेर न्यूज – एका कर्मचाऱ्याचा छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापूरमधील सत्र न्यायालयाने महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अभिजित हराळे (वय २७) यांच्यासह तीन जणांना दोषमुक्त केले. कार्यालयीन सेवेत वरिष्ठांनी कामासाठी  केलेल्या सक्तीला छळवणूक म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात फार्मासिस्ट म्हणून काम करणाऱ्या संजय व्हटकर (वय ४८) या कर्मचाऱ्याने १८ एप्रिल २०१७ रोजी सोलापूर-गुलबर्गा लोहमार्गावर तिलाटी (ता. अक्कलकोट) येथे एका रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्यात ‘मला सहायक आयुक्त अभिजित हराळे, आरोग्य विभागाचे अधीक्षक ए. के. आराध्ये व राजू सावंत यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे’ असे नमूद होते. त्याची पत्नी उषा व्हटकर हिने यासंदर्भात सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्यासह अन्य संबंधित दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांच्यासमोर झाली. व्हटकर हा शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याने आत्महत्या करण्याअगोदर आठवड्यापूर्वी महापालिकेतच झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या वेळी चौकशीप्रसंगी त्याने दिलेल्या जबाबात कार्यालयातील कामाचा ताण सहन न झाल्याने व मानसिक संतुलन बिघडल्याने आपण गोळ्या खाल्ल्या. माझी कोणाविरूध्दही तक्रार नाही, असे म्हटले होते. हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालात मृताच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर मृत व्हटकर याचेच आहे, असे स्पष्टपणे सांगता येणार नाही, असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे हराळे यांच्यासह तिघा अधिकाऱ्यांना याप्रकरणी जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. धनंजय माने यांनी केला. सेवेत कार्यालयीन कामकाजासाठी केलेल्या सक्तीला छळ म्हणता येणार नाही, असे मत मांडत न्यायालयाने तिघांना दोषमुक्त केले.  सरकारी पक्षाला तिघाही अधिकाऱ्यांविरूध्दचा पुरावा सिध्द करता आला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. धनंजय माने यांच्यासह अ‍ॅड. जयदीप माने व अ‍ॅड. विकास मोटे यांनी, तर सरकारतर्फे अ‍ॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − thirteen =