चौफेर न्यूज –  इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेल्या गोधड्यांवरील सिमेंटचा गट्टू महिलेच्या निष्काळजीपणामुळे खाली खेळत असलेल्या लहान मुलाच्या डोक्यात पडला. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमारास काळेवाडी मधील शांतिकृपा सोसायटी, तापकीर नगर येथे घडली.

चंदा बाळू दाखले (वय ३३, रा. तापकीरनगर झोपडपट्टी, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुवर्णा सोनवलकर (रा. मंगलदीप अपार्टमेंट, तापकीरनगर, काळेवाडी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा यांनी रविवारी त्यांच्या अपार्टमेंटच्या गच्चीवर गोधड्या वाळत घातल्या होत्या. त्या दुपारी एकच्या सुमारास गोधड्या वाळल्यानंतर गोळा करत होत्या. गोधड्या वाऱ्याने उडून जाऊ नये, यासाठी त्यांनी त्यावर सिमेंटचे गट्टू ठेवले होते. पण गोधड्या गोळा करताना त्यांनी निष्काळजीपणाने सिमेंटचा गट्टू बाजूला न करता तशीच गोधडी ओढली. यामुळे गोधडीवरील सिमेंटचा गट्टू गच्चीवरून खाली पडला. त्यावेळी इमारतीच्या खाली काही मुले खेळत होती. सुवर्णा यांच्या निष्काळजीपणामुळे खाली पडलेला सिमेंटचा गट्टू चंदा यांच्या मुलाच्या डोक्यात पडला. यामध्ये त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावरून चंदा यांनी गुरुवारी (दि.११) रात्री सुवर्णा यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × one =