पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर सादर करणार आजोळची गाणी

चौफेर न्यूज –  खान्देशातून उद्योग, व्यवसाय निमित्त पिंपरी, चिंचवड व पुणे शहरात स्थायिक झालेल्या बंधू, भगिनींनी एकत्रित येऊन खान्देश संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘खान्देश सांस्कृतिक महोत्सावाचे’ आयोजन केले आहे. अशी माहिती महोत्सवाचे कार्याध्यक्ष पि. के. महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

रविवारी (दि. 14 ऑक्टोबर) पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फूले रंगमंदिरात सकाळी 11 वाजता खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रिडा मंच पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या महोत्सवाचे उद्‌घाटन पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, अकोल्याचे महापौर विजय आगरवाल, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार पद्मश्री ना. धों. महानोर, ज्येष्ठ पत्रकार अजित चव्हाण, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, रोहित काटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका माई ढोरे, स्वाती काटे, चंद्रकांता सोनकांबळे, ज्येष्ठ उद्योजक अशोक थोरात, स्वागताध्यक्ष प्रशांत निकम, निमंत्रक विजया मानमोडे आदी उपस्थित राहणार आहेत.

तत्पुर्वी सकाळी 9 वाजता नवी सांगवीतील डायनासोर गार्डन पासून नटसम्राट निळू फुले रंगमंदिरापर्यंत सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या महोत्सवात पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर (अखिल भारतीय खान्देश कोहिनुर), डॉ. उषा सावंत (जीवन गौरव), अजित चव्हाण (अखिल भारतीय खान्देश भूषण), तसेच अशोक थोरात, रविंद्र शेलार, भगवान गवळी, लेफ्ट. डॉ. जितेंद्र देसले, विजय पवार, विद्या भाटीया, गितांजली कोळी, कैलास बोरसे, ऋचा बिरारी, चैताली भोईर, राजेंद्र वाघ, पुंडलीक सैंदाणे, राजेंद्र रौंदळ यांना ‘खान्देश रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पारंपारिक भिलाऊ नृत्य, तीन पावली, बारा पावली, कानबाई गौराई गीते, अहिराणी भारुड, गाणी, लोकगीते, लोकनृत्य, छक्कड, पोवाडा, बायजाबाईन सोंग, किल्लनी भाजी कयनानी भाकर,  पपेट शो, लगीन गीते, बतावनी अशा खान्देशी संस्कृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे मुख्य आकर्षण सायंकाळी 5:30 वाजता ज्येष्ठ संगितकार पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांची ‘आजोळची गाणी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे संयोजन पंकज निकम, शरद पाटील, शोभा पगारे – धर्मशाळे, सुरेश पाटील, गणेश जगताप, बापू पिंगळे, मोतीलाल भामरे, सुरेश मानमोडे, अभिजीत मानमोडे, छाया भदाणे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 12 =