चौफेर न्यूज – बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्या ठरू शकतात. त्यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला असून त्यात त्यांची संपत्ती १ हजार कोटी इतकी दाखवली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्यास त्या सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्य ठरणार आहेत.

जया बच्चन यांनी आज चौथ्यांदा राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजचे राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांनी २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ८०० कोटी दाखविली होती. तर जया बच्चन यांनी आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण १ हजार कोटींची मालमत्ता दाखविली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्या तर त्या सिन्हा यांना मागे टाकून सर्वात श्रीमंत खासदार बनणार आहेत.

२०१२ मध्ये समाजवादी पार्टीकडून राज्यसभेसाठी नामांकन अर्ज भरताना जया बच्चन यांनी त्यांची एकूण संपत्ती ४९३ कोटी रुपये दाखविली होती. २०१२ मध्ये त्यांच्याकडे केवळ १५२ कोटी रुपये स्थावर आणि २४३ कोटी रुपये जंगम मालमत्ता होती. आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची आणि पती अमिताभ बच्चन यांची एकूण स्थावर मालमत्ता ४६० कोटी रुपये दाखविली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार बच्चन दाम्पत्यांकडे एकूण ६२ कोटींचं सोनं आणि इतर दागिने आहेत. त्यात अमिताभ यांच्याकडे ३६ कोटींचे तर जया बच्चन यांच्याकडे २६ कोटींचे दागिने आहेत. या दोघांकडे १२ कार असून त्यांची किंमत १३ कोटी रुपये एवढी आहे. त्यात रोल्स रॉयस, तीन मर्सिडीज, एक पोर्श आणि एका रेंज रोव्हरचा समावेश आहे. अमिताभ यांच्याकडे एक टाटा नॅनो कार आणि एक ट्रॅक्टर सुद्धा आहे. शिवाय अमिताभ यांच्याकडे ३.४ कोटींच्या घड्याळ असून जया बच्चन यांच्याकडे असलेल्या घड्याळांची किंमत ५१ लाख रुपये एवढी आहे.

नऊ लाखाचा वापरतात पेन..

अमिताभ यांच्याकडील एका पेनची किंमत ९ लाख रुपये इतकी आहे. बच्चन दाम्पत्यांकडे फ्रान्सच्या ब्रिगनॉगन प्लेज येथे ३,१७५ स्क्वेअर मीटर एवढे आलिशान घर आहे. त्याचप्रमाणे नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगरमध्येही त्यांची प्रॉपर्टी आहे. जया बच्चन यांच्या नावे लखनऊ येथील काकोरीमध्ये १.२२ हेक्टरची शेती आहे. त्याची किंमत २.२ कोटी इतकी आहे. तर अमिताभ यांच्या नावे बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर येथे ३ एकरचा प्लॉट असून त्याची किंमत ५.७ कोटी इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 4 =