पिंपरी :- यंदाच्या राज्यातील पूर परिस्थिती पाहता पिंपरी चिंचवड हद्दीतील गणेश मंडळांनी आपला गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. पिंपरी चिंचवड शहर हे शांतताप्रिय शहर असून या शहराचा नावलौकिक कायम ठेवून याही वर्षी गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते श्री.एकनाथ पवार यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पोलिस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथिल गणेशोत्सव शांतता बैठकीच्या वेळी ते बोलत होते.

या बैठकीस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, विनायक ढाकणे, नगरसेवक शाम लांडे, शत्रुघ्न काटे, नगरसदस्या सुजाता पालांडे, आरती चोंधे, अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, गतवर्षीच्या गणेशोत्सवात पोलिस संख्या कमी असूनही पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयाने कायदा सुव्यवस्था याबाबत उत्तम कामगिरी करुन यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. त्याचप्रमाणे शहरातील स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरीक संघटना व पोलिस मित्र संघ यासारख्या सामाजिक संस्थांमुळे गणेशोत्सव विसर्जन यशस्वीरित्या पार पाडले जातात. सध्या पूरामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जी संकटाची परिस्थिती उद्भवली आहे, याचा विचार करता गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या वर्गणीतील जास्तीत जास्त रक्कम पूरग्रस्तांसाठी देणगी म्हणून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. महापौर राहूल जाधव सध्या पूरग्रस्त भागात मदत कार्य करीत असल्यामुळे आज बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, देशातील सद्यस्थिती पाहता गणेश मंडळांनी दक्षता बाळगून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच पूरस्थितीमुळे निर्माण झालेली राज्यातील परिस्थिती पाहता सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. परवाना बाबतीत सर्वांना समान वागणूक दिली जाईल. पोलिस यंत्रणा सर्वतोपरी सहाय्य करतील. गणेशमंडळे, स्वयंसेवी संस्था व पोलिस प्रशासन यांनी एकमेकांशी समन्वय साधल्यास गणेशोत्सव शांतनेने साजरा होण्यास मदत होईल. शहरातील प्रत्येक पोलिस चौकीमध्ये परवाना मिळण्यासाठी एक खिडकी योजनेची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सवा दरम्यान शेवटच्या काही दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपणाची परवानगी राहील असेही ते म्हणाले.

पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ प्रास्ताविकपर मनोगतात म्हणाले, मनपा हद्दीत १८४५ नोंदणीकृत मंडळे असून इतर मंडळांनी पोलिस खात्याकडे नोंदणी करावी, आवश्यक ते परवाने प्राप्त करुन घ्यावेत, त्यासाठी सर्वत्र एक खिडकी योजना कार्यरत आहे. लाऊड स्पीकरसाठी वेळेची मर्यादा असून खास गणेशोत्सवाकरीता सहाव्या, सातव्या, आठव्या व दहाव्या दिवशी लाऊडस्पीकर बारा वाजेपर्यंत वापरण्यास परवानगी आहे. तथापि, आवाजाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी आपले स्वयंसेवक व सीसीटीव्ही कॅमेरामार्फत येणा- या गर्दीवर देखरेख ठेवावी. व दक्षता बाळगून संशयास्पद व्यक्ती, वस्तू आढळल्यास पोलिस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधावा असेही ते म्हणाले.

यावेळी नागरीकांनी शांतता बैठकीत अनेक गणेशोत्सव मंडळे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावरील खडडे दुरुस्ती करणे, वायरींग हटविणे, चांगल्या काम करणा-या संस्थांना मनपाने प्रशस्तिपत्रे द्यावीत आदि सूचना व मते मांडली.

मनसे गटनेते सचिन चिखले यांनी उपस्थितांना राज्य व केंद्र शासनाच्या पर्यावरण पूरक नियमांचे पालन करुन गणेशोत्सव पार पाडावा यासाठी मनपाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असे सांगितले.

शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, पूरग्रस्तांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल याचा गणेश मंडळांनी विचार करावा आणि मंडळांनी ऐच्छिक वर्गणी ठेवावी अश्याप्रकारचे आवाहनही त्यांनी केले.

नगरसेविका सुजाता पालांडे यांनी त्यांच्या मनोगतात गणपती विक्रीची दूकाने मोठ्या प्रमाणात लावली जातात. गणेश विसर्जनानंतर त्याची योग्य ती खबरदारी घ्यावी असे मत व्यक्त केले.

विरोधी पक्षनेता नाना काटे यांनी त्यांच्या मनोगतात गणेशोत्सव साजरा करताना यंदा पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे, याचे भान ठेवून तो साधेपणाने साजरा करावा असे मत व्यक्त केले. एक खिडकी योजना व्यवस्थितपणे ठेवली तर मंडळांना जाण्यायेण्याचा त्रास कमी होईल व वेळही वाचेल. गणेश मंडळांनी पोलिस यंत्रणेच्या सूचनेनुसार ध्वनीक्षेपक व इतर सूचनांचे पालन करावे असेही ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, मूर्तीचे शक्यतो विसर्जन करु नये. पर्यावरणपूरक मूर्ती असाव्यात. थर्माकोल, प्लास्टीक सारख्या अविघटनशील वस्तूंचा वापर टाळावा. या वर्षी देखील मूर्तींचे दान व्यवस्था असणार आहे. तसेच मनपातर्फे विसर्जन हौदांची निर्मिती करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये मंडळांना परवाना मिळणेसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. शक्यतो मंडळांनी खड्डेविरहीत मंडप उभारावेत. या वर्षीची राज्यातील पूरपरिस्थिती पाहता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुन मंडळांनी आदर्श निर्माण करावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. सूत्रसंचालन सहा. आयुक्त आण्णा बोदडे यांनी केले तर आभार स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =