18 एप्रिल : महावितरणचे दैनंदिन कामकाज अधिक गतीशील, पारदर्शी आणि परिणामकारक बनविण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील तंत्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. तंत्रज्ञ व इतर कर्मचा-यांकडून प्राप्त सूचनांच्या आधारावर संजीव कुमार यांनी ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. सेवेत हयगय करणा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तंत्रज्ञांशी थेट संवाद साधणारे संजीव कुमार हे महावितरणचे पहिलेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.   

महावितरणमधील सर्व 16 परिमंडलांतील मुख्य अभियंत्यांसोबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सोमवारी (दि. 17) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी केवळ मुख्य अभियंत्यांसोबत संवाद न साधता संजीव कुमार यांनी तंत्रज्ञ, जनमित्र, ऑपरेटर, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी यावेळी दिले.

सर्व ग्राहकांचे मीटरवाचन हे प्रत्येक महिन्यात वेळेत व्हायला हवे. तसेच प्रत्येक ग्राहकाला त्याचे वीजबील हे वेळेत जायलाच हवे. विजेसंबंधीचे महत्वाची कामे ही कर्मचा-यांनी प्राधान्याने करावीत व नियोजनपूर्वक देखभालीची ठरविलेली कामे ही ग्राहकांना पूर्वसूचना देऊन करावीत. प्रत्येक महिन्याला वीजबिलाच्या रक्कमे एवढी वसूली  झाली पाहिजे, याकडे लक्ष देऊन विजेची थकबाकी वाढणार नाही हे प्राधान्याने बघावे. ग्राहकसेवेचा दर्जा सुधारून कोणत्याही ग्राहकाला त्रास होणार नाही, याकडे कटाक्षाने बघितले पाहिजे तसेच यात हयगय करू नये. प्रत्येक पातळीवर पारदर्शकता असलीच पाहिजे. कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. नवीन वीजजोडणी, नावात बदल इत्यादींच्या फॉर्ममध्ये सुटसुटीतपणा असला पाहिजे. नवीन वीजजोडणी ऑनलाईनद्वारेच देण्यात यावी इत्यादी मुद्यांवर संजीव कुमार यांनी भर दिला.

फोटो मीटर रिडिंग, मीटरचे छायाचित्र, फिडर व डीटीसी मीटर रिडिंग, नवीन वीज जोडणी, वीजबील भरणा व इतर दैनंदिन कामे ही मोबाईल ऍ़प्सद्वारेच करण्यात यावीत.  ही कामे करणा-या संस्थेने यामध्ये हयगय केल्यास या संस्थेच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले. तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना दिला जाणारा एसएमएस हा मराठीतून देण्यात यावा, असेही निर्देश संजीव कुमार यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − three =