चौफेर न्यूज –  चिखलीतील पंचशील फिल्टर या कंपनीला लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी पहाटे चिखली परिसरात घडली.

अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे यानी दिलेल्या माहितीनुसार,  कुदळवाडी चिखली येथील स्पाईन रोड, घरकुल जवळील ‘पंचशील फिल्टर्स’ नावाची कंपनी आहे. गुरूवारी पहाटे १२.२० वाजता या कंपनीला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलात मिळाली. त्यानुसार, चिखली आणि संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब  घटनास्थळी दाखल झाला.

मात्र आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण, भोसरी, तळवडे आणि अग्निशामक मुख्यालयातून आणखीन आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग आणखी भीषण स्वरूप धारण करीत असल्याने एमआयडीसी हिंजवडी आणि चाकण, पुणे अग्निशामक दल आणि खासगी कंपन्यांचेही बंब मदतीला बोलविण्यात आले. आसपासचे बारा पाण्याचे टँकर मदतीला बोलविण्यात आले होते. पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली. पंचशील फिल्टर ही कंपनी अक्षय बाफना आणि सुरेश बाफना यांच्या मालकीची आहे. या कंपनीत फिल्टर्स तयार होतात. त्यासाठी फॅब्रिक मटेरियल आणि कागद यांचा उपयोग केला जातो. या साहित्यामुळे आग झपाट्याने पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =