चौफेर न्यूज – चेस बॉक्सिंग अमॅच्युअर वर्ल्ड चँम्पियनशिप यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत धोत्रे यांनी भारताचे नेतृत्व केले असून पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच धोत्रे यांच्या माध्यमातून कांस्य पदक प्राप्त झाले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पश्चिम बंगाल, कलकत्ता येथे २६ ते २९ जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत भारतासह, जर्मनी, रशिया, फिनलैंड, अमेरिका यासह अनेक देशातील एकूण १२५ खेळाडू सहभागी झाले होते. चेस बॉक्सिंग हा खेळ सध्या २२ ते २५ देशात खेळला जातो. या स्पर्धेत राहुल धोत्रे यांनी भारत देशाचे नेतृत्व केले.

फिनलंडचा खेळाडू साकरी यांच्यावर मात करुन राहुल यांने उपांत्यफेरीमध्ये धडक मारुन भारतासाठी कांस्य पदक पटकाविले. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहराला कांस्य पदक प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल राहुल धोत्रे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल धोत्रे यांच्या या कामगिरीबद्दल छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव, छावा पुणे जिल्हाध्यक्ष अमोल वीर, सागर जगताप, अमित भोसले, समीर वीर, आकाश लांडगे, किरण रजपुत, विकास  लांडगे, अक्षय वीर, हनी थोरात, दत्ता गावडे, अभिषेक तांबे, अविनाश तेलगावे, यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राहुल धोत्रे हे बॉक्सिंग, चेस बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू आहेत. आजपर्यंत राहुल यांनी अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत राहुल यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. वरिष्ठ गटात कांस्य पदक देखील मिळविले आहे. राष्ट्रीय स्तरावर स्कूल गेममध्ये कांस्य पदक आणि वरिष्ठ गटातील स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑल इंडिया केवकप स्पर्धेत रजत पदकाची कमाई केलेली आहे. यासह अनेक स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. आता चेस बॉक्सिंगमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत कांस्य पदकाची कमाई करुन देशाचे नाव उंचाविले आहे. राहुल यांनी बॉक्सिंगमध्ये अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. पुढील वर्षी मास्को येथे होणा-या चेस बॉक्सिंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राहुल धोत्रे सहभागी होणार असून त्यांनी आतापासूनच स्पर्धेची जोरदार तयारी सुरु केली आहे.

स्पर्धेबाबात सांगताना राहुल धोत्रे म्हणाले, ‘चेस बॉक्सिंग हा खेळ १९९२ ला सुरु झाला असून बुध्दीबळ आणि बॉक्सिंग हे दोन्ही खेळ एकत्र करुन ‘चेस बॉक्सिंग’ ही स्पर्धा घेण्यात आली. यासाठी मी बुध्दीबळाची आत्मियतेने तयारी केली. सातत्याने बुद्धिबळ खेळण्याचा सराव केला. त्यानंतर बॉक्सिंगची तयारी केली. चेस बॉक्सिंगची स्पर्धेचा एक राऊंड तीन मिनिटांचा होता असे एकूण ११ रांऊड होतात. हा खेळ अतिशय चांगला असून ज्ञान वाढण्यासाठी खूप गरजेचा आहे. बुद्धी कशी चालवयाची हे बुद्धीबळामुळे कळते.

मला पहिल्यापासून खेळाची आवड होती. देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. परंतु, घरची परस्थिती बिकट आहे. कोणाचाही आधार नव्हता. मजुरीचे काम करता-करता बॉक्सिंगचा सराव सुरु केला. त्यानंतर बॉक्सिंगच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो. पदक मिळवित गेलो. कांस्य पदकाची कमाई करुन  देशाचे नाव उज्ज्वल केल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी यासाठी पिंपरी महापालिकेच्या शाळांमध्ये देखील ‘चेस बॉक्सिंग’ या खेळाचा समावेश करण्यात यावा, असेही धोत्रे म्हणाले. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये या खेळाचा समावेश केला असून महापौर स्पर्धा घेतल्या जातात. त्याच धर्तीवर पिंपरी पालिकेने देखील स्पर्धा घ्यावात अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − six =