चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड उदयोगनगरीतील सह्याद्रीचे मावळे अनिल दत्तात्रय वाघ (वय 33 वर्षे), क्षितीज अनिल भावसार (वय 27 वर्षे) आणि रवि मारुती जांभूळकर (वय 30 वर्षे) हे युवक सोमवार दि. 19 फेब्रुवारीला साजरी होणारी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वात उंच माऊंट किलीमांजरो (समुद्र सपाटीपासून उंची 5895 मीटर) या पर्वतावर साजरी करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे, सुर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम होणार आहे. शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहिम आहे. यासाठी सोमवारी (दि. 12 फ्रेबुवारी) हे युवक मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला प्रयान करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खुप कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे. सह्याद्रीचे हे मावळे शिवजयंतीच्या दिवशी तेथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम होणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मोहिम यशस्वी झाल्यानंतर हे चित्रीकरण सर्वांसाठी यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. गिर्यारोहणासारख्या साहसी क्रिडा प्रकारात युवकांनी यावे यासाठी देश परदेशात अशा मोहिमांचे आयोजन आम्ही करतो. यासाठी सामाजिक संस्था, उद्योजक, कंपन्या व दानशूर व्यक्तींनी मदत करावी. असे आवाहन सुशिल दुधाणे यांनी केले.

या मोहिमेसाठी राहण्याची व वैद्यकीय सुविधा बेंगलोर माऊंटेनिंग क्लबच्या एजन्सी मार्फत होणार आहे. अनिल वाघ हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशामक दलात सेवेत आहे. त्याने आतापर्यंत हिमालयातील अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. तसेच ‘लिंगाणा’(1000 फूट उंच) अवघ्या 22 मिनिटात चढून 23 मिनिटात उतरण्याचा विक्रम त्याने केला आहे. लिंगाणावर चढण्यासाठी दोरीचा वापर करावा लागतो मात्र वाघ याने कोणत्याही साधनाचा वापर न करता अनवाणी पायाने ही मोहिम यशस्वी केली. तसेच वजीर, वानरलिंगी सुळका, तैलबैला अशा अवघड मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. क्षितीज भावसार हा मुंबईत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतात. अनेक शॉर्टफिल्म, सिरीयल व जाहीराती त्यांनी चित्रीत केल्या आहेत. प्रसिध्द हरिचंद्र गड, कळसूबाई शिखर, अलंगमदन या गडांवर त्याने यशस्वी चढाई व ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण केले आहे. रवि जांभूळकर चिखलीतील शेतकरी कुटूंबातील तरुण पहिल्यांदाच गिर्यारोहणातील परदेशी मोहिमेत सहभागी होत आहे. व्यवसायाने बांधकामी व्यवसायीक असून तरी दर रविवारी गडकिल्यांवर चढाई करणे त्याचा छंद आहे. तैलबैला, लिंगाणा, हरिचंद्र, तारामती, कळसूबाई शिखरांसह त्याने आतापर्यंत 80हून जास्त गडकिल्यांवर यशस्वी चढाई केली आहे.

जगातील सात उंच शिखरांपैकी (Seven summit ) चौथ्याक्रमांकाचे शिखर किलीमांजरोसह माऊंट एव्हरेट (समुद्र सपाटीपासून उंची 8,848 मीटर), ॲकॉनकागुआ (6961 मीटर), देनाली (6194 मीटर), माऊंट इलब्रस (5642 मीटर), माऊंट ब्लान्स (4810 मीटर) ही सर्व शिखरे आगामी काळात सात मावळ्यांना बरोबर घेऊन पादाक्रांत करु, व तेथे छत्रपतींच्या पुतळ्याचा अभिषेक करुन अभिवादन करण्याचा मनोदय अनिल वाघ यांनी पिंपरी (पुणे), येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =