पिंपरी : संतपीठ जागतिक दर्जाचे होण्यासाठी काय करता येईल, याबाबत काम होत आहे. भारतीय संस्कृतीचा अभ्यास जगाच्या नकाशावर पाठवायचा आहे. भारतीय संतांनी शांततेची शिकवण दिली आहे. सर्व संतांचे ग्रंथरूपी बौद्धिक भांडार आपल्याकडे उपलब्ध आहे. या बौद्धिक भांडाराच्या आधारे आपण जगाला शांततेचा संदेश देऊ शकतो. त्यासाठी संतपीठाची मोठी मदत होणार आहे. भारतीय संतांचा विचार संतपीठाच्या माध्यमातून जगभर पोहोचणार आहे, असे मत संतपीठाचे संचालक आणि संत अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. तुकाराम महाराजांचे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांच्या हस्ते टाळगाव चिखली येथे संतपीठाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माउली महाराजांचे सतरावे वंशज माउली महाराज नामदास तसेच आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, डॉ. सदानंद मोरे, राजू महाराज ढोरे, स्वाती मुळे, तानाजी शिंदे, आळंदी देवस्थान वारकरी शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त दिनकर शास्त्री भुकेले, आळंदी देवस्थानचे विश्‍वस्त अभय टिळक आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीमध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाविषयी समाजातील मान्यवरांना उत्सुकता आहे. माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या आरक्षित असलेल्या जागेवर संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. पंचक्रोशीतील हरी भक्ती पारायण मंडळींनी सकाळी भजन केले. सर्व मंडळींनी नामस्मरण केले. त्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

राजू महाराज ढोरे म्हणाले, भारत देश विविध संस्कृती, सभ्यतांनी नटलेला आहे. भारतामधील सर्व जाती, धर्मांमध्ये संत होऊन गेले आहेत. त्यांची शिकवण आजच्या समाजाला खूप गरजेची आहे. सर्व संतांनी शांतीचा संदेश दिला आहे. संत विचार जागतिक पातळीवर नेऊन मांडण्यासाठी या संतपीठाची मोठी मदत होणार आहे. संतपीठाच्या माध्यमातून हा संतविचार जागतिक पातळीवर मांडला जाणार आहे. संत संदेशांचे शिक्षण या संतपीठामध्ये दिले जाणार आहे. भारताची विविधतेतून एकता आणि शांती या दोन गोष्टी जगाच्या कल्याणासाठी महत्वाच्या आहेत. संतांची ग्रंथरूपी संपत्ती भारताला लाभली आहे. ते शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. यातून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, संतपीठासाठी जागा मिळविण्यासाठी अनेक अडचणी आल्या. संचालक मंडळाने जागा मिळवताना आलेल्या अडचणींचा सामना केला आहे. आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने याचा पाठपुरावा करून हा विषय तडीस नेला आहे. याबाबत आरोप देखील झाले. चांगले काम करण्यासाठी त्रास हा होतोच. पण सर्वांनी हा त्रास सहन करून ही जागतिक दर्जाची नवनिर्मिती केली आहे.

व्हिजन 2020 अंतर्गत अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा साधला समन्वय
आमदार महेश लांडगे यांनी 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरी विधानसभा मतदार संघाचा ‘व्हिजन 2020’ हा संकल्प सोडला. याअंतर्गत अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा समन्वय साधण्यासाठी संतपीठाची संकल्पना मांडण्यात आली. ही संकल्पना पूर्णत्वाकडे जात असून संतपीठाचे भूमिपूजन आज (रविवारी) करण्यात आले. संत शिकवणीसह आधुनिक शिक्षणाचा देखील या माध्यमातून प्रसार केला जाणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळे असा समन्वय साधणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरी संस्था स्थापन करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =