वात्सल्य हेच प्रेमाचे व आदराचे प्रतीक रेणू गावसकर

चौफेर न्यूज –  बाळ आणि आई हे नातं प्रथम स्पर्शातून आकाराला येते. स्पर्शाएवढेच संस्काराला महत्व आहे. जन्माचा संस्कार ते शेवटचे संस्कार हे जीवनभर टिकणारी बाब आहे. वात्सल्याच्या स्पर्शाने अनाहूत नात्यात देखील अतूट नातेसंबंध निर्माण होतात. वात्सल्य फक्त स्पर्शापूरतेच मर्यादित नसून ते प्रेमाचे, आदराचे प्रतीक आहे. वात्सल्याच्या स्पर्शामध्येच भावनांची देवाण-घेवाण असते. वात्सल्याचा स्पर्श जीवनभर प्रेरणादायी असतो, असे मार्गदर्शन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावसकर यांनी केले.

रविवारी (दि. 27 जानेवारी 2019) नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे मेळाव्याचे स्पर्श वात्सल्याचा या तनुश्री गर्भसंस्कार केंद्राच्या सातव्या स्नेह मेळाव्यात गावसकर बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई मोडक, ज्येष्ठ संपादक मल्हार अरणकल्ले, डॉ. अनिल गुगळे, अभिनेत्री नेहा हिंगे, तेजश्री वालावलकर, आण्णा भारेकर (प्रगतशील शेतकरी) प्राजक्ता कुलकर्णी (स्नेहांकुर दत्तक केंद्र), ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. आशा संगमनेरकर, ज्येष्ठ आहार तज्ञ व स्त्री रोग तज्ञ सुनंदा रानडे, साधिका डॉ. प्राग्भा विराट, बी. के. संजीवनीदिदि, अमृता चांदोरकर आदी उपस्थित होते.

रेणू गावसकर म्हणाल्या की, आजच्या बालकांना आजी-आजोबांकडून ऐकायला मिळणा-या ऐतिहासिक गोष्टींमुळे मुले अनुभव समृद्ध होतात. परिस्थितीशी लढण्याची व पुढे जाण्याची उमेद त्यातून निर्माण होते. आधुनिक युगात मुलांना ‘ब्रँण्डींग’ शिकवू नका. ब्रँण्डींगमुळे त्यांच्यामध्ये भेदभावाची पेरणी होते. चांगले, वाईट, योग्य अयोग्य त्यांचे त्यांना ठरवू द्या. पालक म्हणून संस्कारांची जबाबदारी पूर्ण करा, असेही गावसकर म्हणाल्या.

ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले म्हणाले की, हा कार्यक्रम कल्याणाचा, विकासाचा मार्ग दाखविणारा आहे. स्पर्श कुठलाही असो, तुम्ही किती संवेदनशील आहात त्यावर ते ठरते व त्यातील वात्सल्याची भावना तुम्हाला जाणवते. उन्नत, पवित्र, पारदर्शी स्पर्श न करताही उत्कट भावनेने, शब्दातून, डोळे मिटून स्पर्श करता येतो. सेवेचा स्पर्श लगेच आनंद देतो तर भावनेचा स्पर्श अनंतकाळ प्रेरणा देतो. दुस-याचं भलं व्हाव यासाठी डोळे मिटून केलेली भावना देखील स्पर्श आहे. स्वानुभवासारखा दुसरा संस्कार नाही. डोळे मिटून आतखोल स्वत:मध्ये पहावे जीवन खूप सुंदर व पवित्र असल्याचे दिसेल, त्यामुळे स्वत:कडे पाहण्याची दृष्टी मिळेल. त्यातूनच सुदृढ सशक्त समाज व देश घडेल असा आशावाद अरणकल्ले यांनी व्यक्त केला.

साधिका डॉ. प्राग्भा विराट म्हणाल्या की, एक स्मितहास्य जग जिंकू शकते. हास्य हे देखील स्पर्श आहे. नजरेतून स्पर्श निर्माण होतो, त्यातून हृदयात प्रेम भावना निर्माण होते. त्यामुळे मस्त, स्वस्थ आणि समृद्ध होण्यासाठी चेह-यावर नेहमी हास्य ठेवावे.

प्रास्ताविकात डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या की, वाढलेल्या शहरीकरणामुळे कुटूंब चौकोणी, त्रिकोणी होऊ लागली आहेत. मेट्रो सिटींमध्ये वाढत्या स्पर्धेतून आता विभक्त कुटूंब आणि ‘एकल पालकत्व’ ही पाश्चात्य संस्कृती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली कुटूंबातील सदस्य संख्या कमी होत असल्यामुळे युवा पिढी नको त्या गोष्टींना बळी पडत आहे. त्यामुळे एकमेकांतील सुसंवाद कमी होत आहेत. परिणामी माता, पिता आणि युवा पिढीत वैचारिक दुरावा निर्माण होत आहे. आजच्या तरुण तरुणींमध्ये व्यवसाय, नोकरीतील तीव्र स्पर्धेमुळे शारिरीक व मानसिक ताणतणावाच्या अनेक समस्या उद्‌भवत आहेत. त्याचा विवाहित जोडप्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक विवाहित जोडप्यांमध्ये गर्भधारणेच्या जटील समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते. आनंदी नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी जपत योग्य मार्गदर्शन, औषधोपचार, गरोदर मातांचे आरोग्य आणि काळजी याविषयी समाजात जागरुकता निर्माण करण्याचे कार्य तनुश्री गर्भसंस्कार केंद्राच्या माध्यमातून केले जाते. संस्थेच्या वतीने उपस्थितांना मोफत आहार मार्गदर्शन, रक्त तपासणी व हाडातील कॅल्शियमची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गायिका उमा नेने यांनी प्रेरणादायी गाणी सादर केली. सुत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. स्वागत डॉ. अनिल गुगळे यांनी तर आभार मनोज मुनोत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − three =