साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा

साक्री : पोस्टमन, भाजीवाला, मोबाईल, पेन्सील, पुस्तक, कम्प्यूटर यासह चक्क ‘तारे जमीन पर’ अवतरले. निमित्त होते साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे. या स्पर्धेत चिमुरड्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध विषयांनुसार वेशभूषा करत चिमुरड्यांनी स्पर्धेत

रंगत भरली.

साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. नर्सरीच्या विद्यार्थ्यांना अवकाशातील वस्तू आणि पक्षी, ‘युकेजी’ च्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान आणि शैक्षणिक साहित्य आणि ‘एलकेजी’च्या विद्यार्थ्यांसाठी ‘अवर हेल्पर्स’ (Our Helpers) असा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेसाठी रांगोळी रेखाटन करण्यात आले होते. त्यात विषयानुरूप रेखाटन करून विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. रोहिणी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी सूर्य, चंद्र, पृथ्वी यांची वेशभूषा सादर करून पर्यावरण वाचवा असा संदेश दिला. विविध पक्षांसह मोराची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘नाच रे मोरा नाच’ या गाण्यावर या वेळी नृत्य सादर केले. ‘अवर हेल्पर्स’ या विषयानुसार ‘एलकेजी’च्या विद्यार्थ्यांनी दुधवाला, भाजीवाला, डॉक्टर अशा वेशभूषा केल्या होत्या. ‘युकेजी’च्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान या विषयावर मोबाईल, कम्प्यूटर, पेन्सील, पुस्तक आदी स्वरुपाच्या वेशभूषा सादर केल्या. मोबाईल विषयी एका विद्यार्थिनीने या वेळी सांगितले की, ‘ओ मम्मी-पापा, जब से व्हॉटस् अ‍ॅप आया, हमसे ध्यान हटाया, दिनभर व्हॉटस् अ‍ॅप करते हो, हमे नही पढाते हो, कॅन्डीक्रश के दिवाने हो, हम बच्चोसे अंजाने हो’, अशाप्रकारे आपली व्यथा तिने व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. वैशाली लाडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक सुनीता पाटील, वृषाली सोनवणे, श्वेता रौंदळ, प्रीती लाडे, प्रतिभा अहिरराव, वैशाली लाडे, भारती पवार, पूनम पवार, हर्षदा पाटील, बंदीश खैरनार, जयश्री बोरसे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात पुढाकार घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 13 =