पिंपरी चिंचवड– महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल आयोजित तीनदिवसीय बालचित्रपट महोत्सवाची रविवारी उत्साहात सांगता झाली. सुमारे तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या महोत्सवात सहभाग नोंदवला.

चित्रपट तज्ज्ञ प्रसन्ना हुलीकवी यांनी चित्रपट रसग्रहणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दृश्‍यम व्हीएफएक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीवकुमार यांनी सिटीप्राइड (निगडी) शाळेत व्हिज्युअल इफेक्‍टचा (व्हीएफएक्‍स) चित्रपटात कसा वापर केला जातो, याबद्दल माहिती दिली. या तंत्राचा वापर करून आभासी चित्र कसे निर्माण केले जाते, याचे संगणकीय सादरीकरण दाखविण्यात आले. सायन्स पार्कमध्ये रेड बलूनसह आणखी काही लघुपट दाखविण्यात आले. महोत्सवात तिन्ही दिवशी शहरातील मुले-मुली आणि त्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचा लाभ मुख्यतः महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला. महोत्सवात रोज चिंचवड स्टेशन येथील कार्निवल सिनेमागृहात सकाळी बालचित्रपट दाखविण्यात येत होते. चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्क, ऑटो क्‍लस्टर, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहातही राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुपट, व्हीएफएक्‍स कार्यशाळा आयोजित केली होती.

महोत्सवाचा मुख्य उद्देश हा परिसरातील विद्यार्थ्यांना चित्रपट कसे पाहावेत, याबद्दल शिक्षण देणे हा होता. श्‍यामला वनारसे यांनी संयोजन समितीला मार्गदर्शन केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी फोर्ब्ज मार्शलच्या बीना जोशी, स्वप्नील उंबरे आणि कंपनीचे स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व महापालिकेतील सीएसआर (सामाजिक दायित्व) प्रमुख विजय वावरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three − 3 =