चौफेर न्यूज – मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अनेक मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. कमी पगार संसाराला पुरत नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरेसा पैसा नसल्याने आमच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकूनही नये का? असा सवाल हे कर्मचारी करीत आहेत. लोकसत्ताने या कर्मचाऱ्यांची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न  केला.

संपामुळे पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर बस स्थानकात बस उभ्या आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांचा भावना लोकसत्ता ऑनलाइन ने जाणून घेतल्या आहेत. यातील एक कर्मचारी तुषार कांबळे (नाव बदलले) म्हणाले, मी औरंगाबादचा असून मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात राहत आहे. घर भाड्याने आहे त्यासाठी सहा हजार रुपये भाडे द्यावे लागते. १९९८मध्ये मोठी स्वप्न घेऊन कंडक्टर (वाहक) म्हणून एसटी खात्यात नोकरीला लागलो. त्यावेळी मला केवळ ९०० रुपये महिना पगार मिळायचा, महागाई नव्हती त्यात कसं तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. मात्र, आता २० वर्षानंतर या महागाईच्या जमान्यात जेमतेम ९ हजार रुपये पगार मिळतो.

हा तुटपुंजा पगार देऊन सरकार एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा करीत आहे. मुलगा आठवीत शिकत आहे तर मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. एवढ्या तुटपुंज्या पगारात संसार कसा चालवायचा, दोन्ही मुलांची शिक्षणं कशी करायची हा प्रश्न सतावतो. आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकू नये का? मोठी होऊ नये का? असा सवाल कांबळे यांनी केला. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

कांबळे पुढे म्हणाले, माझी पत्नी शिलाई काम करते म्हणून कसं तरी आमचं भागतं, माझे सर्व मित्र सरकारी नोकरीत आहेत. त्यांना उत्तम पगार मिळतोय आम्हीच काय केलं आहे. गेल्या संपात चार दिवसांचा पगार कापला गेला, त्याचाही त्रास झाला. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 10 =