चौफेर न्यूज – ‘त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा पाडण्याच्या घटनेचे मी समर्थन करत नाही. मुळातच भाजप पुतळे उभारण्याच्या विरोधात आहे. पुतळ्यांची चिंता कमी करा, जिवंत माणसांची अधिक करा, असाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे. मात्र, लवकरच त्रिपुराचे विकासपुरूष महाराज वीर विक्रम किशोर यांचा पुतळा आगरताळा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारात बसविण्यात येणार आहे,’ असे सांगून भाजपचे त्रिपुरातील प्रभारी आणि विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी लेनिन यांच्या पुतळा पाडण्याच्या विषयावर पडदा टाकला. पाडलेला पुतळा पुन्हा बसविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी या वेळी दिले.

त्रिपुरातील भाजपच्या विजयानंतर देवधर यांचे सोमवारी प्रथमच पुण्यात आगमन झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने त्यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस दिगंबर दराडे आणि सुकृत करंदीकर व्यासपीठावर उपस्थित होते. त्रिपुरातील विजयाची कारणमीमांसा करताना माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या कारकिर्दीचे वाभाडे काढून देवधर यांनी त्रिपुरातील कायदा-सुव्यस्थेचे गेल्या पंचवीस वर्षातील विदारक चित्र उभे केले.

‘त्रिपुरात सत्तेवर आल्यानंतर राजकीय हिंसा संपवू, असे आम्ही यापूर्वीच जाहीर केले आहे. कम्युनिस्ट-भाजपच्या कार्यकर्त्यांना एकमेकांवर हल्ले करू देणार नाही. निकालानंतर त्रिपुरात होत असलेल्या हल्ल्यांबाबत संबंधितांवर ठोस कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्रिपुरात मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट पक्षाचे लोक भाजपमध्ये प्रवेश करत असून, मोदी टीशर्ट घालून दहशत माजवत आहेत. या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर बाहेरच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश सहा महिन्यांसाठी रोखण्यात आला आहे,’ असेही देवधर म्हणाले. त्रिपुरातील कायदासुव्यस्था, मोठ्या भ्रष्टाचारामुळे जनता माणिक सरकार यांच्या विरुद्ध गेली होती. मात्र, त्यांना योग्य पर्याय मिळत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखविलेला विश्वास तसेच या ठिकाणी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांच्या फौजेमुळे भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असल्याचे देवधर यांनी नमूद केले. त्रिपुरामध्ये आजपावेतो एक हजार राजकीय खून झाले आहेत. आपल्या विरोधात कोणी आवाज उठवला तर, त्याला संपवायचे, ही कम्युनिस्ट राजवट आहे. शंतनू भौमिक, सुदिप दत्त भौमिक या पत्रकारांच्या हत्या याची उदाहरणे आहेत, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + two =