चौफेर न्यूजत्रिपुरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या मुस्लीमांना स्थानिक मशिदीनं वाळित टाकलं असून प्रवेश बंदी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या मुस्लीमांना वेगळी मशिद बांधावी लागली आहे. जनसत्ता ऑनलाइननं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण त्रिपुरामध्ये मोईदातिला नावाचं गाव आहे, जिथे 83 कुटुंब मुस्लीमांची आहेत. यापैकी 25 कुटुंबांनी येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत असा दावाही या 25 मुस्लीम कुटुंबांनी केला आहे. मात्र, यामुळे त्यांना अन्य मुस्लीमांनी वेगली वागणूक दिली असून त्यांना गावातील मशिदीत नमाज पढण्यास मनाई करण्यात आली. परिणामी त्यांनी वेगली मसिद बांधली असून आता या लहानशा गावात दोन मशिदी झाल्या आहेत.

आम्ही 16 महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आम्हाला मशिदीमध्ये नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे बाबुल हुसेन यांनी सांगितले. जोपर्यंत हिंदुत्ववादी पक्षाला समर्थन द्याल तोपर्यंत इथं नमाज पढता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं आहे. शेवटी या लोकांनी पत्र्याची एक वेगळी मशिद बांधली आहे. या मशिदीमध्ये वेगळ्या इमामाचीही नियुक्ती करण्यात आली असून ही 25 कुटुंबे पैसे काढून इमामाला पगार देतात. त्रिपुरामध्ये निवडणुका होऊ गातल्या असून भाजपा संपूर्ण शक्तीनं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपावर केवळ हिंदुत्ववादी असल्याचेच नाही तर मुस्लीमविरोधी असल्याचे आरोपही होत आहेत. त्रिपुरामध्ये दोन दशकांहून अधिक काळ डाव्यांचं सरकार आहे. हे सरकार उलथवण्यासाठी भाजपा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करेल असे आरोपही विरोधकांनी केले आहेत. मात्र, बाबुल हुसेन म्हणतात की भाजपा हिंदुवादी पार्टी असल्याचं आपल्याला वाटत नाही. मुस्लीमांवर हल्ले करण्यामध्ये भाजपा सहभागी असल्याचं काँग्रेस व कम्युनिस्ट सांगतात परंतु आपला त्यावर विश्वास नसल्याचं हुसेन यांनी म्हटलं आहे. काँग्रेस संपल्यात जमा आहे असं सांगतानाच डाव्यांनी 25 वर्षे सत्ता उपभोगली परंतु आपल्या पदरात काहीही पडलं नसल्याचं हुसेन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता आली तर आमच्या समस्या सुटतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 − one =