चौफेर न्यूज

महिला विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या पदरी निराशा आली आहे. एखाद्या बड्या स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ ज्याप्रमाणे अपयशी ठरताना दिसतो. अगदी तशीच अवस्था महिला क्रिकेटर्सची झाली. ब्रिस्टॉलच्या मैदानात यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळवण्यात आला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ बाद २१८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर फलंदाज लौराने १०० चेंडूत ६६ धावा केल्या. तर मिगनॉनने नाबाद ७६ धावांची खेळी केली. आफ्रिकेने दिलेले हे आव्हान इंग्लंडच्या महिलांनी दोन चेंडू आणि दोन गडी राखून पार करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना अखेरपर्यंत रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी अखेरच्या षटकात इंग्लंडला ६ चेंडूत ३ धावांची तर दक्षिण आफ्रिकेला ३ विकेट्सची आवश्यकता होती. अखेरच्या षटकात इस्माइलने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडला एक धाव घेण्यात यश आले. विजयासाठी दोन धावांची आवश्यकता असताना इस्माइलने मार्शला तंबूचा रस्ता दाखवला. मैदानात उतरलेल्या अन्या श्रुबसोलने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचत इंग्लंडच्या अंतिम सामन्यातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडच्या विजयानंतर आफ्रिकेच्या महिलांना अश्रू अनावर झाले होते. कारण सतरा वर्षांची संधी त्यांनी गमावली होती.

यापूर्वी २००० मध्ये रंगलेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. १७ वर्षांपूर्वी ओव्हलमध्ये रंगलेलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकन महिलांना ९ विकेट्स राखून पराभूत केले होते. उपांत्य सामन्यातील महिलांच्या या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेच्या पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील चोकर्सचे ग्रहण लागल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ इंग्लंडसोबत महिला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला शह देऊन नवा इतिहास रचणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × four =