चौफेर न्यूज – संपूर्ण देश सध्या आयसीयूत असून गरीबांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दाररोज एका तरी गरीबावर डॉक्टरांनी मोफत इलाज करावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया देशभरातील डॉक्टरांना केले आहे. त्यांनी लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आरोग्य सेवेबाबत सरकारच्यावतीने ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या पुरेशा नाहीत. देशातील २९ टक्के जनतेपर्यंतच सरकारी आरोग्य सेवांची पोहोच आहे. उर्वरित ७१ टक्के आरोग्य सेवा खासगी डॉक्टरांनी सांभाळली आहे. आरोग्य सुविधांची अवस्था सुधारण्यासाठी यासाठीच्या निधीमध्ये आणखी वाढ करायला हवी, अशी अपेक्षा त्यांना व्यक्त केली आहे.
वाराणसीतील आईएमएमध्ये रविवारी आयोजित इंडिया हेल्थ लाइन कार्यक्रमात डॉक्टरांना संबोधित करताना ते बोलत होते. डॉक्टरांना दरदिवशी किमान एका गरीब रुग्णाला मोफत सेवा देताना इंडिया हेल्थ लाइनच्या अंतर्गत असे रुग्ण डॉक्टरांकडे पाठवण्यात येणार आहेत.
यासाठी तोगडिया यांनी १८६०२३३३६६६ हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे. यावर फोन करणाऱ्या गरीब रुग्णांना या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. याशिवाय दूर गावांपर्य़ंत पोहोचण्यासाठी हेल्थ अॅम्बेसिडरही बनवले जात आहेत. हे महिन्यांतील कुठल्याही एका रविवारी गावांमध्ये आणि वाड्या-वस्तांवर जाऊन आरोग्य जागरुकता मोहिम चालवणार आहेत. यामध्ये लोकांना मोफत ब्लडप्रेशर, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तपासता येणार आहे. त्याचबरोबर रूग्णांच्या योग्य इलाजासाठी हेल्थ लाईनच्या माध्यमांतून सेवा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दहा लाख रक्तदात्यांच्या मेगा क्लब बनवण्यात येणार आहे. महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठीही यामध्ये सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. प्रत्येक आरोग्य संघटनेच्या माध्यामांतून महिलांचे महिला डॉक्टरांच्या माध्यमांतूनच आरोग्य परिक्षण केले जाणार आहे.