पिंपरी चिंचवड ः हिंजवडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहाजणांच्या टोळीला पोलिसांनी संशयास्पद हालचालींवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता, गुप्ती अशी दीड लाख रुपयांची घातक हत्त्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 22) मध्यरात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. सहा जणांपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर, दोनजण फरार झाले आहेत. शुभम मणिलाल जैन (वय 21, गिरजा कॉलनी, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव), प्रकाश किशोर मोरे (वय 27, गणेशवाडी, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव), विशाल अरुण वाघ (वय 22, रा. महुखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव), प्रतिक शिवाजी बारी (वय 20, रा. आयटीआय कॉलनी, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव) यांना अटक केली आहे. प्रशांत पाटील आणि रामेश्‍वर राठोड हे दोघेजण दुचाकीवरून फरार झाली आहेत. सहा जणांचे टोळके हिंजवडी परिसरातल्या कंपनीवर किंवा अन्य कोठेतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते. कोलते पाटील स्कीमपासून अर्धा किलोमीटर नेरे गावाकडे जाणार्‍या रोडवर सर्वजण जमा झाले होते. याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी शिताफीने त्याठिकाणी सापळा रचला. आरोपींच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच पोलिसांनी तातडीने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्यातील चारजणांना पोलिसांनी अटक केली. तर दोनजण दुचाकीवरून फरार झाले. त्यांच्याकडे एक लोखंडी कट्ट्यार, गुप्ती, चाकू, कोयता, कात्री, रिवॉल्वर सारखे दिसणारे लायटर अशी दीड लाख रुपयांची घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four − 1 =