चौफेर न्यूज –  जैन धर्मात पर्युषण काळात दान, शील, तप व भाव या चार रुपात धर्माची आराधना करावी, हे धर्मक्रिया व भावधर्माशी निगडीत आहे. या काळात अनुकंपा दान, सत्‌पात्री दान, अभय दान देणे पुण्य कर्म आहे. तसेच सदाचार, विषय त्याग, ब्रह्मचर्य हे शिलधर्माशी संबंधित आहे. उपवास, आयंबिल, विषयत्याग, रसत्याग हे बाह्यधर्माची रुपं आहेत. त्याचबरोबर प्रायश्चित, विनय, सेवा, संत स्वाध्याय, ध्यान ही तपाची रुपं आहेत. तप काळात अहंकार नसावा, असे मार्गदर्शन  प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी चिंचवड येथे केले.

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, पर्युषण पर्व काळात सामुहिक प्रतिक्रमण करून निसर्गातील सर्व जीवजंतुंची, पर्यावरणाची माफी मागितली पाहिजे. सर्व जीवांशी असणारा वैरभाव मिटवून मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करावेत. त्यासाठी अगोदर आत्म्याची शुद्धी तपाच्या माध्यमातून केली जावी. या काळात साधू-साध्वी व भक्त-भाविकांनी स्थानकात निवास करावा. विषय सुखापासून दूर राहून आत्मचिंतन करून आत्म्याशी लीन होऊन संतांच्या सान्निध्यातून आत्मशुद्धी करावी. तीर्थंकर श्रमण भगवान महावीर, पुरुषादानिय पार्श्वनाथ, ऋषभदेव या तीर्थंकरांच्या जीवनाचा अभ्यास करावा, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 10 =