चौफेर न्यूज – स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि अन्य मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे निघाला असून दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असून शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, दीडपट हमीभाव, कर्जमाफी, वीज दरकमी करणे अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत धडकले.२३ सप्टेंबरला हरिद्धारमधून पदयात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी १ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा विस्कटल्यानंतर शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. भारतीय किसान युनियनने ‘किसान क्रांती यात्रा’ या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात ५० हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होणार होता.

मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर धडकला. यात्रेला दिल्लीत येऊ देणार नाही, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी आधीच स्पष्ट केली होती. यानुसार दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. मोर्चा रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मोर्चेकरी येताच पोलिसांनी त्यांना रोखले. जमाव आक्रमक असल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.शेतकऱ्यांवर पाण्याचा माराही करण्यात आला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

आज अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी आणि ‘जय जवान, जस किसान’ असा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. याच दिवसी शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. शेतकरी नेते व विविध राजकीय पक्षांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.’शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. यातून मोदी सरकारचा वाईट चेहरा जनतेसमोर आला आहे’, अशी प्रतिक्रिया या मोर्चात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने दिली. शेतकऱ्यांनी अहिंसेचा मार्गाचा अवलंब करावा, पोलिसांनी बळाचा वापर केला तरी लढा देत राहा, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + nineteen =