चौफेर न्यूज – भारतीय लष्कर अत्याधुनिक शस्त्र खरेदीसाठी एका वेगळ्या पर्यायाचा विचार करत आहे. शस्त्रांची कमतरता असल्याने भारतीय लष्कर दीड लाख सैनिकांच्या नोकरीवर गदा आणण्याचा विचार करत आहे. यामुळे जो पैसा वाचेल, त्या पैशाने शस्त्रांची खरेदी करण्याचा योजना आखली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इतक्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांवर गदा आल्याने 5 ते 7 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. याचा वापर अत्याधुनिक शस्त्रं खरेदी करण्यासाठी करण्यात येणार आहे. यासोबत शस्त्रांची देखभाल करण्यावरही जास्त खर्च करता येणं शक्य होणार आहे.

सध्या लष्कराचं एकूण बजेट १.२८ लाख कोटी रुपये आहे. यामधील ८३ टक्के रक्कम दैनंदिन खर्च आणि वेतनावर खर्च होते. यानंतर लष्कराकडे फक्त २६ हजार ८२६ कोटी रुपये शिल्लक राहतात. भारतीय लष्कर ही रक्कम नवीन शस्त्रांची खरेदी आणि देखभालीवर खर्च करतं. मात्र ही रक्कम फारच कमी असल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. दीड लाख नोकऱ्यांवर गदा आणल्यानंतर लष्कराला खर्चासाठी ३१,८२६ ते ३३,८२६ कोटी रुपये मिळतील. याआधीही भारतीय लष्कराने अनेकदा बजेटची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराकडे मनुष्यबळ कमी करण्याचा प्रस्ताव आला आहे. मात्र सध्या या प्रस्तावावर फक्त चर्चा सुरु आहे. हा प्रस्ताव अद्याप स्विकारण्यात आलेला नाही. सोबतच जवान आणि अधिकाऱ्यांना वेळेआधी निवृत्त करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लष्करातून दरवर्षी ६० हजार जवान, अधिकारी निवृत्त होत असतात. लष्कराला शस्त्रं खरेदीसाठी पुढील काही वर्ष भरती रद्द करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट पदावरील चार वरिष्ठ अधिकारी सध्या यासंबंधी रिपोर्ट तयार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =