निगडी : पिंपरी चिंचवड शहरवासीय एकीकडे पाणीटंचाईला सामोरे जात असताना महापालिकेच्या गलथान कारभारामुळे सोमवार दि.20 रोजी लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया गेले. निगडी येथील कै. मधुकर पवळे पुलाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले घटनास्थळी दाखल होवून  त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याबाबत माहिती दिली. तसेच तातडीने पाण्याचे वॉल बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. 6 मे 2019 पासून पिंपरी चिंचवड शहरवासीय पाणी समस्येला सामोरे जात आहेत. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून येत्या काही दिवसात पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेकडून होत असलेल्या या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 7 =