चौफेर न्यूज पिंपरी चिंचवड व शहर परिसरात महिला व मुलींवर अन्याय, अत्याचारांच्या घटनांमध्ये मागील काळात लक्षणीय वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाले व आर.के. पद्मनाभन यांच्या सारखे क्रियाशील पोलिस आयुक्त मिळाले. पोलिस आयुक्तांनी ज्याप्रमाणे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी कडक धोरण आखून अंमलबजावणी केली आहे व सामान्य नागरिकांच्या खिशातून लाखों रुपयांचा दंड वसूल केला आहे. परंतू त्यांना महिला व मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यात अपयश आले आहे.

शहरात छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे पालकमंत्री गिरीष बापट कासारसाई (हिंजवडी), पिंपरी, चिंचवड येथील पिडीत कुटूंबांना अद्यापपर्यंत भेटले नाहीत. तसेच चिखलीतील पोलिस ठाण्याच्या उद्‌घाटनप्रसंगी बापट यांना प्रश्न विचारले असता त्यांनी याबाबत सोयीस्कर मौन बाळगले. पिडीतांच्या कुटूंबांविषयी असा अनादर करणा-या पालकमंत्री गिरीष बापट यांनी शहरात महिला व अल्पवयीन मुलींवर होणा-या अन्याय, अत्याचारांची नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली आहे.

तसेच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी कठोर पावले उचलावीत. अशीही मागणी शहर महिला कॉंग्रेसने पोलिस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, हुरबानो शेख, विनीता तिवारी आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याच्या चार घटना घडल्या व एका पिडीत मुलीचा खून करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवडला पोलिस आयुक्तालय सुरु करण्यात आले. अद्यापही शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले नाही. शहरातील युवती, महिला प्रचंड तणावाखाली जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. याबाबत गिरीष बापट यांनी साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही. अशा संवेदनाहिन व सोयीस्कर बहिरेपणाचे सोंग बाळगणा-या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + seven =