चौफेर न्यूज राज्याच्या शिक्षण विभागाने पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि द्रष्टे समाजसुधारक महात्मा फुले यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्राला अधिक झुकते माप दिले असून ३ लाख रुपये गांधी यांच्या पुस्तकांसाठी, २४ लाख रुपये आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी तर तब्बल ५९ लाख रुपये मोदी यांच्या पुस्तकासाठी खर्च करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे सरकारी पुस्तक खरेदीतील दुजाभावामुळे पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत.

एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत पुस्तक खरेदी केली जाते. नुकतीच त्यासंबंधीची ई-निविदा मंजूर करण्यात आली आहे. या निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या ३५ रुपयांप्रमाणे ७२ हजार ९३३ मराठी प्रती घेण्यात आल्या आहेत. त्यासोबतच ३३ गुजराती, ४२५ हिंदी आणि ७ हजार १४८ इंग्रजी भाषेतील मोदी यांच्यावरील प्रतींचा समावेश आहे. डायमंड पॉकेट बुक्स यांच्याकडून ही सर्व पुस्तके घेण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावरील ६९ हजार ४१६ मराठी भाषेतील प्रतींची खरेदी दि विलास बुक एजन्सीकडून करण्यात आली आहे. एकूण ५९ लाख ४२ हजार इतकी रक्कम केवळ नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावर खर्ची पडली आहे.

विभागाने महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी अवघे ३ लाख २५ हजार खर्च केले. त्यामध्ये सम्राट प्रकाशनाच्या २ हजार ६७५ प्रतींचा समावेश आहे. तसेच गुजराती निशिगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गांधी चरित्राच्या ७ हजार २६० प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. गांधी यांच्याप्रमाणेच संविधानाचे कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक खरेदीवर अशीच अल्प रक्कम दिली आहे. बाबासाहेबांच्या चरित्राच्या ७८ हजार ३३८ प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यावर २४ लाख २८ हजार रुपये खर्ची पडले आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी आणि बहुजनांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावरील पुस्तक खरेदीला अशीच अल्प रक्कम दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − seventeen =