चौफेर न्यूज –  इतिहासाची मोडतोड केल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे भवितव्य आता इतिहास तज्ञांच्या हाती सोपविण्यात आले. त्यासाठी इतिहासतज्ञांच्या सहा सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला ‘पद्मावती’चे नेमके काय होणार हे समजणार आहे.

‘पद्मावती’ हा सिनेमा अंशत: ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे सिनेनिर्मात्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना ‘पद्मावती’ पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. निर्मात्यांनी ‘पद्मावती’ अंशत: ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे सांगून संकट ओढावून घेतल्याचे सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे.

‘पद्मावती’ चित्रपटातील आशयाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ही छाननी करावी लागणार असल्याचे बोर्डाने सांगितले. ‘पद्मावती’ काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.

‘पद्मावती’ १ डिसेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रीलिज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘पद्मावती’ चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. ‘पद्मावती’ सिनेमाचे रीलिज मार्च महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ‘पद्मावती’ पूर्वी विविध भाषांतील जवळपास ४० चित्रपट रांगेत आहेत. इतिहास तज्ञांच्या सहा सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ‘पद्मावती’चे भवितव्य ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × five =