चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 41.84 टक्‍के पाणी साठा उरला आहे. तीव्र उन्हामुळे पाणी साठ्‌यामध्ये कमालीची घट होत असून सतरा दिवसात सहा टक्‍के साठा घटला आहे.

पावसाळा दीड ते दोन महिन्यांवर आहे. मात्र, धरणात 41.84 टक्‍के पाणी साठा असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भिती व्यक्त होत आहे. 31 मार्च रोजी धरणात सुमारे 48 टक्‍के पाणी साठा होता. केवळ 17 दिवसांमध्ये पाणी साठ्यात सहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे. या हिशोबाने अजून पावसाळा सुरु होण्यास जवळपास 50 दिवस बाकी आहेत. पावसाळा लांबल्यास मात्र पाणी टंचाई होऊ शकते. पाटबंधारे खात्याकडून वर्षभरात शहराला धरणातून 4.84 टीएमसी पाणी दिले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला आहे, यावर्षी शहराने निश्‍चित केलेल्या कोट्यापेक्षा 0.5 टीएमसी म्हणजे जवळपास दहा टक्‍के पाणी अधिक उचलले आहे.

यंदा उन्हाळा खूपच कडक असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी झाला असावा, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्‍त करत आहेत. उन्हाळा असाच कडक राहिला तर हे प्रमाण असेच वाढण्याची शक्‍यता आहे. परंतु मंगळवारपासून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगांची गर्दी झाली आहे. जर एक-दोन दिवस चांगला पाऊस झाला तर बाष्पीभवनाने होणारी संभाव्य तूट भरुन निघू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.

50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांना प्रति माणसी प्रति दिवशी 135 लिटर पाणी पुरवले जाते. 50 लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरातील नागरिकांसाठी हे प्रमाण 150 लिटर आहे. परंतु, शहरातील नागरिकांना अधिक पाणी देण्याचा प्रस्ताव झाला असून शहरातील नागरिकांना 155 लिटर पाणी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास अजून अधिक पाणी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =