आकुर्डी ः दुकानात कपडे खऱेदी करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाने ‘पाचशे रूपयात कपडे दे नाहीतर तुमच्याकडे बघून घेण्याची धमकी दिली’. दुकानदाराने कपडे देण्यास नकार दिल्यानंतर साथीदाराला बोलवून घेत दुकानाची तोडफोड करत दुकानदारावर उलट्या कोयत्याने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी रात्री साडेआठ वाजता आकुर्डीतील ममता गारमेंटसमध्ये घडला.

    विष्णू सिघवन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. सोन्या शर्मा (रा. दळवीनगर, चिंचवड) व त्यांचा एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी  पुराराम चौधरी (वय-36, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. बी. खरगे यांनी माहिती दिली. फिर्यादी चौधरी यांचे आकुर्डीत ममता गारमेंटस नावाचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता तिन आरोपी कपडे घेण्यासाठी दुकानात आले होते. आम्हाला पाचशे रूपयात कपडे द्या, नाहीतर तुमच्याकडे बघुन घेऊ, अशी धमकी आरोपीने फिर्यादी व त्यांचा कामगार मनाराम चौधरी याला दिली.

फिर्यादीने कपडे देण्यास नकार देताच आरोपीने साथीदाराला बोलवून घेत फिर्यादीला शिवीगाळ करत शर्टमध्ये लपवलेल्या कोयते बाहेर काढून दुकानाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांच्या पाठीवर उलट्या कोयत्याने मारहाण करत जखमी करून आरोपी पसार झाले. निगडी पोलीसांनी आरोपी विष्णू सिघवनसह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =