आमदार महेश लांडगे यांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे मागणी

पिंपरी चिंचवड : आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणार्‍या वारकर्‍यांसाठी सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. इंद्रायणीनदीमध्ये पाणी सोडण्यात यावे. कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. महापालिकेतर्फे पिण्याची पाण्याची सोय करावी, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिंपरी-चिंचवड शहरातील मुक्काम 26 जून रोजी होणार आहे. यासाठी, पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक झाली.
पालखी सोहळ्यादरम्यान इंद्रायणी नदीमध्ये पाणीसाठा ठेवण्यात यावा. त्यासाठी जादा पाणी सोडावे. पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. वारकर्‍यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी. टँकर उपलब्ध करावेत. तात्पुरते शौचालय, अग्निशमन बंब, आरोग्य सेवा, स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. कचरा कुंड्या उपल्बध कराव्यात. पालखीचे स्वागत करण्यासाठी उभारण्यात येणारे स्वागत कक्ष पालखी मार्गाच्या रस्त्यामध्ये किंवा अडथळा निर्माण होतील, असे उभारु नयेत. योग्य अंतरावर अथवा रस्त्याच्या बाजूस उभारावेत. त्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 5 =