चौफेर न्यूज बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावर ‘पावर’बाज उत्तरे पवारांनीही दिली. या मुलाखती दरम्यान आपल्यावर अनेक आरोप झाले त्याचे आपण कधीच लगेच खंडण न केल्यामुळे गैरसमज वाढले का? या राज ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दाऊदशी संबंध असल्याच्या त्यांच्यावरील आरोपाचा किस्सा शरद पवार यांनी ऐकवला.

पवार याविषयी सविस्तर बोलताना म्हणाले, अनेक आरोप आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात झाले. पण मला या आरोपांचे खंडण करत त्यांचे स्पष्टीकरण करणे कधी महत्वाचे वाटले नाही. आपल्याला या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे माहीत होते आणि त्यामुळे अशा आरोपांची पर्वा कधी केली नाही. अनेक आरोप होऊनही त्यातून काय समोर आले हे स्पष्ट असल्यामुळे आपण खोट्या आरोपांची चिंता केली नाही. माझे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांनी एकेकाळी मोठी राळ उठवून देण्यात आली होती. त्यावेळी अनेक आरोप झाले पण त्यात काही तथ्य नाही. मात्र, हा आरोप कसा झाला त्याच्या मुळाशी जाऊन माहिती घेतली.

पवार या आरोप होण्यामागचा किस्सा सांगताना म्हणाले, त्यावेळी एका वर्तमानपत्राचा पत्रकार दुबईमध्ये असलेल्या दाऊदच्या भावाला भेटला आणि त्याला मुंबईबाबत प्रश्न विचारले. मुंबई पोलीस दाऊदमुळे आपल्यालाही पकडतील त्यामुळे दुबईत राहत असल्याचे सांगत मुंबईत परतण्याची खूप इच्छा असल्याचेही त्याने सांगितले होते. पत्रकाराने त्यावर त्याला बॉलिवूड मधले कोण आवडते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, वैगरे प्रश्न विचारले. त्यावर त्याने महाराष्ट्राच्या सीएमना कोण ओळखत नाही, आपण त्यांना ओळखतो, असे उत्तर दिले आणि संबंधित पत्रकाराने बातमीचा फक्त तेवढाच भाग हेडलाईन करून वापरला. खासदार राम नाईक यांनी पुढे याच बातमीचा आधार घेत संसदेत हा मुद्दा उपस्थित करून प्रकरणाला वेगळेच वळण दिले आणि दाऊदच्या संबंधांबाबत अधिकच राळ उठली, असा किस्सा शरद पवार यांनी ऐकवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 9 =