चौफेर न्यूज पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी कँम्प येथील उद्यानात शहीद हेमू कलानी यांच्या अर्ध पुतळा सुशोभिकरण करून बसविण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षापासून हे काम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रलंबित होते. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवक गैरहजर असल्याने त्यांनी बहिष्कार टाकला असल्याची चर्चा यावेळी होती.

या कार्यक्रमाला महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक संदीप वाघेरे, बाबा त्रिभुवन, सिमा चौगुले, मोरेश्वर शेडगे, जोतिका मलकानी, माजी नगरसेवक संतोष कुदळे तसेच परिसरातील सिंधी बांधव उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, इंग्रजांनी दिडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात अनेक शहीदांनी मोठे योगदान दिले आहे. त्यात शहीद हेमू कलानी यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण होते. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. मरण पत्करले परंतू सहकार्यांची नावे सांगितली नाही, ते खरे देशभक्त होते. म्हणूनच हुतात्मा हेमू कलानी यांच्या हौताम्य कधीही न विसरण्यासारखे आहे. परंतू इतके वर्ष त्याचा हा पुतळा का नाही झाला हा मोठा प्रश्न आहे. १५ वर्षे त्याच्या पुतळ्याला न्याय मिळाला नाही याचे दुख: वाटते. येथे उभारण्यात येणार्या पुतळ्याकडे बघून लोकांना नक्कीच स्फुर्ती मिळणार आहे. ६ महिन्याच्या आत या पुतळ्याचे काम पूर्ण होणार असून भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्णजी अडवाणी यांच्या हस्ते या पुतळ्याचा लोकार्पण करण्याचा मनोदय अाहे. आज या वीर हुतात्म्यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला मिळाले. या परिसरात मोठा सिंधी समाज आहे. सिंधी समाजाचे अनेक गुण घेण्यासारखे आहेत. कोणत्याही कामात हे बांधव मागे रहात नाहीत. म्हणूनच कोणताही व्यवसाय असो सिंधी बांधव यशस्वी होतोच.

लक्ष्मण जगताप म्हणाले, शहीद हेमू कलाणी अखंड भारतासाठी आदर्श होते. स्कील डेव्हलपमेंट सिंधी समाजाकडून शिकावे. १०० टक्के सिंधी बांधव व्यापारात यशस्वी होतात. शहीद हेमू कलाणी यांच्या पुतळ्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या पुतळ्यासाठी पाठपुरावा केला. ज्या काही अडचणी होत्या, त्यातून मार्ग काढूत आज हा पुतळा उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक विकासाच्या कामासाठी भाजपा कटीबध्द आहे.

संदीप वाघेरे म्हणाले, १८ वर्षापासून या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. महापालिकेच राष्ट्रवादी तसेच काँग्रेस सत्तेत असताना हा प्रश्न मार्गी लागायला हवा होता. मात्र त्यावेळच्या नगरसेवकांनी कोणताही पाठपुरावा केला नाही. आता महापालिकेत एक वर्षापूर्वी भाजपाची सत्ता आली. नगरसेवक झाल्यापासून या पुतळ्याच्या कामाकरिता सातत्याने पाठपुरावा केला. ज्या काही परवानग्यांच्या अडचणी येत होत्या त्यातून मार्ग काढत आज हा पुतळा येथे साकारत आहे. येत्या ६ महिन्यात या उद्यानात पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक गैरहजर होते. याबाबत नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भूमिपूजनाचा कार्यक्रम ११ वाजता होता. नगरसेविका उषा वाघेरे, निकीता कदम यांच्यासह मी तेथे वेळेत हजर होतो. १२ वाजेपर्यंत आम्ही पालकमंत्र्यांची वाट पाहिली परंतू ते वेळेत आले नाहीत. पुण्यात राष्ट्रवादीची साडेबारा वाजता अजित पवार यांची पक्षाची महत्वाची बैठक होती. त्यामुळे आम्ही तीनही नगरसेवक त्या बैठकीला गेलो होतो. शहिद हेमू कलानी यांचा पुतळा व्हावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केलेत. पुतळा होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे. यात कुठल्याही नाराजीचा प्रश्न नाही. मी काम करतोय, मात्र यात आता श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे. आम्हाला कोणतेही श्रेय नको, जनता सुज्ञ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − four =