रविवारपासून कार्यकर्ते लागणार कामाला

चौफेर न्यूज मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर शहरातील पक्षाचे कार्यकर्ते उत्साही झाले आहेत. उमेदवारी जाहीर झाली आता प्रचाराची धामधूम पहायला मिळणार आहे. ‘नातू’ पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ ‘आजोबा’ शरद पवार स्वतः फोडणार आहेत. येत्या रविवारी (दि. 17) वाल्हेकरवाडीत जाहीर सभा घेऊन पार्थ यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे.

पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सस्पेन्स कायम ठेवला होता. तथापि, पार्थ यांच्या गाठीभेटी आणि पायाला भिंगरी लावून मतदार संघाचा घेतला जाणारा आढावा पाहता त्यांची उमदेवारी निश्चितच मानली जात होती. अखेर शरद पवार यांनी दुसरी यादी जाहीर करून त्यांची उमेदवारी आज अधिकृतरित्या जाहीर केली. त्यामुळे उत्सुकता लागलेल्या हजारो कार्यकर्त्यांना आता प्रचाराची घाई झाली आहे. युवा कार्यकर्ते व युवकांचे तडफदार नेतृत्व असलेल्या पार्थ यांच्या प्रचाराला नेमकी कोठून सुरूवात करायची, याची चर्चा करण्यापूर्वी पक्षाने प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम तातडीने जाहीर केला आहे.

पार्थ यांचे आजोबा शरद पवार स्वतः त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. येत्या रविवारी वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे पवार साहेबांची सभा होणार आहे. या सभेचे नियोजन करण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिका-यांवर सोपविली आहे. युवा कार्यकर्ते आणि युवक पदाधिकारी कामाला लागले आहेत. अखेर उमेदवारी जाहीर झाल्याने मावळसाठी इच्छुक राहिलेले संजोग वाघेरे आणि भाऊसाहेब भोईर यांनी नाराजी बाजुला ठेवून पार्थ यांचा प्रचार करण्याची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 5 =