चौफेर न्यूज –  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तुरळक मार्गावर पीएमपीच्या बस धावत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. पिंपरी कँम्पातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शहराच्या विविध भागातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. पुणे लोणावळा लोकल प्रवासावर याचा परिणाम झाला असून सकाळपासून लोकल सेवा सुरळीत सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिरूर, खेड, बारामती, जुन्नर, दौंड, मावळ, भोर तालुका या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, संपूर्ण शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी आपली नित्याची कामे करावीत. तसेच आंदोलनासंदर्भात कोणताही मेसेज, माहिती सोशल मीडियावरून पाठवताना पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी ट्विटवरवरून केले आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महत्वाच्या रस्त्यांवर तुरळक वाहने धावताना दिसून येत आहेत. वर्दळ कमी असली तरीही वाहतूक सुरळीत सुरु आहे. लक्ष्मी रास्ता, बाजीराव रस्त्यावरील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर तसेच पिंपरीमधील वल्लभनगर बस स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या बस आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तीनही बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी हिंजवडीच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे कसरत असते मात्र आज या रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. या परिसरातही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 1 =